वीजयंत्रणा धोकादायक आहे ; व्हॉट्सअॅपवर कळवा
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर जिह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील वीजतारा तुटणे, झोळ पडणे किंवा जमीनीवर लोंबकळणे, फ्यूज पेटय़ा व फिडर पिलरचे दरवाजे तुटणे किंवा नसणे, खोदाईमुळे भूमिगत केबल उघडय़ावर पडणे अशा वीजसुरक्षेला धोका निर्माण करणाऱया यंत्रणेची माहिती देण्यासाठी किंवा तक्रार करण्यासाठी महावितरणने नागरिकांना मोबाईलद्वारे व्हॉट्सअॅप व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी याबाबत परिपत्रक काढले असून व्हॉट्सअॅपद्वारे प्राप्त झालेल्या फोटो माहिती, तक्रारींनुसार वीजयंत्रणेची ताबडतोब दुरुस्ती करण्यात यावी तसेच संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात यावे असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
कोल्हापूर जिह्यासाठी 7875769103 हा व्हॉट्सअॅप मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर फक्त वीज वितरण यंत्रणेपासून सुरक्षेचा धोका असल्याच्याच फोटोसह माहिती, तक्रारी स्वीकारण्यात येणार आहेत. या मोबाईल क्रमांकावर नागरिकांनी कॉल करू नये. फक्त व्हॉट्सअॅपद्वारे माहिती द्यावी, असे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच ज्या नागरिकांकडे व्हॉट्सअॅप नाहीत त्यांनी ‘एसएमएस’द्वारे या मोबाईल क्रमांकावर माहिती दिल्यास त्याचेही निराकरण करण्यात येणार आहे.
महावितरणची वीजतार तुटलेली आहे, झोल किंवा जमीनीवर लोंबळकत आहे. फ्यूज पेटय़ा किंवा फिडर पिलरचे झाकणे उघडी किंवा तुटलेले आहे, तसेच रोहित्रांचे कुंपण उघडे आहे, खोदाईमुळे भूमिगत वाहिनी उघडय़ावर आहे अशाच स्वरुपाची माहिती, तक्रारी छायाचित्रांसोबत संबंधीत स्थळाच्या संपूर्ण पत्त्याचा उल्लेख करून व शक्य असल्यास स्थळाच्या लोकेशनसह नागरिकांनी व्हॉट्सअॅपच्या मोबाईल क्रमांकावर पाठवता येणार आहे. यासोबतच अशा स्वरुपाच्या तक्रारींसाठी महावितरणच्या टोल फ्री क्रमांकावर देखील सध्या सुरु असलेली सेवा उपलब्ध राहील.
व्हॉट्सअॅपद्वारे महावितरणच्या मोबाईल क्रमांकावर आलेली फोटोसह माहिती किंवा तक्रार लगेचच संबंधीत विभागीय व उपविभागीय कार्यालयात पाठविण्यात येणार आहे. तक्रारीनुसार वीजयंत्रणेच्या दुरुस्तीचे काम झाल्यानंतर संबंधीत तक्रारकर्त्यांना व्हॉट्सअॅपद्वारेच दुरुस्तीनंतरचे छायाचित्र पाठवून कळविण्यात येणार आहे. नागरिकांनी पाठविलेल्या काही तक्रारींचे निवारण करण्यासाठी वरिष्ठ कार्यालयांची मंजुरी, निधी किंवा शिफ्टींगची गरज असल्यास तसे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येतील व त्याबाबत संबंधीत तक्रारकर्त्यांना कळविण्यात येणार आहे. महावितरणच्या या उपक्रमाला नागरिकांनी प्रतिसाद देऊन वीजसुरक्षेसाठी वीज वितरण यंत्रणेतील धोके कमी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणने केले आहे.