पुणे / प्रतिनिधी :
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) नवे शैक्षणिक वर्ष एक सप्टेंबरपासून, तर यापूर्वीच्या अभ्यासक्रमांना प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष एक ऑगस्टला सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तरी देखीलसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांमधील प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांच्या परीक्षांचा प्रश्न पूर्णपणे सुटला नसतांना; तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव असताना शैक्षणिक वर्ष तातडीने सुरू करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. या निर्णयाचे सविस्तर परिपत्रक विद्यापीठाने वेबसाइटवर प्रसिद्ध केले आहे.
यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यूजीसीने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना नवे शैक्षणिक वर्ष एक सप्टेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचप्रमाणे विद्यापीठ आणि महाविद्यालयांमध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष एक ऑगस्टपासून सुरू करण्यात येईल, असे स्पष्ट केले आहे. मात्र, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने महाविद्यालयात प्रवेशित विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्ष हे १५ जूनपासून सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी विद्याशाखेतील सायन्स, इंजिनीअरिंग, आर्किटेक्चर, फार्मसी यांचे पदवी अभ्यासक्रम १५ जूनपासून, तर पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम एक जुलैपासून सुरू करण्याचे नियोजन आहे.
त्याचप्रमाणे कॉमर्स आणि मॅनेजमेंट विद्याशाखेतील कॉमर्सचे अभ्यासक्रम १५ जूनपासून तर मॅनेजमेंटचे अभ्यासक्रम एक जुलैपासून सुरू होणार आहेत. ह्युमॅनिटी विद्याशाखेतील कला, सामाजिक शास्त्रे वअभ्यासक्रम १५ जूनपासून, तर विधी अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष एक जुलैपासून सुरू करण्यात येणार आहेत. इंटरडिसीप्लिनरी विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांचे शैक्षणिक वर्ष एक जुलैपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, विद्यापीठाच्या शैक्षणिक विभागांचे शैक्षणिक वर्ष १ जुलैपासून सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यापीठांचे शैक्षणिक विभाग आणि महाविद्यालयांचे शैक्षणिक वर्ष सुरू करण्याच्या तारखांमध्ये तफावत का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.