प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटकाळात शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेबाबत गोंधळाची परिस्थिती पहायला मिळते. प्रत्यक्ष शिक्षण सुरू नसले तरी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. तरीदेखील महाविद्यालयीन स्तरावर प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक असून पदवीपूर्व शिक्षण विभागातर्फे प्रवेशाची तारीख वाढविण्यात आली असून ऑक्टोबरअखेर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.
महाविद्यालयांनी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना लिंकच्या माध्यमातून अध्यापन सुरू केले असले तरी कोविड-19 मध्ये विविध समस्येत अथवा अडचणीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेता आलेला नाही. यामुळे पदवीपूर्व महाविद्यालयात प्रवेश कालावधीत वाढ करण्यात आली आहे. नुकताच दहावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश घेता येणार आहे. पदवीपूर्व शिक्षण विभागाच्या संचालिका स्नेहल आर. यांनी प्रवेशाची तारीख वाढविण्यात आल्याचा आदेश जारी केला असून त्यानुसार 29 ऑक्टोबरपर्यंत 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येणार आहे.