वृत्तसंस्था/ कौलालंपूर
महिलांची एएफसी चॅम्पियन्स लीग स्पर्धा 2023 मध्ये सुरू करण्यात येणार असल्याचे आशियाई फुटबॉल फेडरेशनने सांगितले. आशिया खंडातील महिला फुटबॉलला बळकटी आणणे, हा या नव्या आंतरराष्ट्रीय क्लब स्पर्धेचे आयोजन करण्यामागचा हेतू असल्याचे फेडरेशनने स्पष्ट केले.
2011 मध्ये जपानने महिला विश्वचषक फुटबॉल स्पर्धा जिंकली होती. याशिवाय ऑस्ट्रेलिया, चीन यांचे अन्य बलवान संघही आशियामध्ये आहेत. मात्र क्लब स्तरावर महिला फुटबॉलच्या लोकप्रियतेच्या बाबतीत युरोप, अमेरिकेच्या तुलनेत आशिया खंड खूपच मागे आहे. 2019 मध्ये फ्रान्समध्ये झालेल्या महिलांच्या विश्वचषक स्पर्धेत आशियातील एकही महिला संघ उपांत्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारू शकला नव्हता. 1991 नंतर पहिल्यांदाच अशी वेळ आली होती. त्यासाठी आशियाई फुटबॉल कॉन्फेडरेशनने कंबर कसली असून दोन वर्षात महिलांसाठी चॅम्पियन्स लीग सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे, असे एएफसी महिला फुटबॉलच्या अध्यक्षा बाय लिली म्हणाल्या. ही स्पर्धा महिला फुटबॉलला निश्चितच नवसंजीवनी देईल, असेही त्या म्हणाल्या. 2004 च्या अथेन्स ऑलिम्पिकमध्ये त्या चीन संघातून खेळल्या होत्या.
एएफसीने 2019 मध्ये पहिल्या महिला क्लब चॅम्पियनशिपला दक्षिण कोरियात सुरुवात केली होती. त्यात ऑस्ट्रेलिया, चीन, जपान व द.कोरिया या चार संघांनी भाग घेतला होता. त्याची दुसरी आवृत्ती यावर्षी आणि तिसरी स्पर्धा 2022 होणार असून 2023 मध्ये महिलांची पहिली क्लब चॅम्पियन्स लीग आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेचा आराखडा निश्चित करण्याचे काम सुरू असून त्यात किती संघांचा सहभाग असणार, हे अजून स्पष्ट झालेले नाही, असेही त्यांनी सांगितले. महिला फुटबॉलला संजीवनी देण्यासाठी एएफसीचा पाठिंबा मिळतो आणि ट्रेनिंग व निधीही त्यांच्याकडून या विभागासाठी दिला जातो. या वर्षी होणाऱया पुरुषांच्या चॅम्पियन्स लीगमध्ये 40 क्लब्सचा सहभाग असणार आहे.