महिला प्रवाशांशी साधला जातोय संवाद
प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वे विभागातर्फे मागील काही वर्षांपासून महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी विविध उपाययोजना राबविल्या जातात. याचाच एक भाग म्हणून रेल्वे विभागाने (सहेली अभियान सुरू केले आहे. एकटय़ा प्रवास करणाऱया महिलांशी रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला पोलीस संवाद साधून त्यांना मार्गदर्शन करीत आहेत. यामुळे एकटय़ाने प्रवास करणाऱया महिलांच्या मनातील भीती आता काही प्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे.
रेल्वेतील गर्दीचा फायदा घेऊन चोऱया तसेच इतर गैरप्रकार मोठय़ा प्रमाणात होतात. यामुळे महिला प्रवासी एकटय़ाने प्रवास करताना अनेक समस्या येत होत्या. यासाठी रेल्वे विभागाने सहेली हे अभियान राबविले आहे. कोणत्याही महिलेस प्रवासा दरम्यान मदत हवी असल्यास महिला रेल्वे पोलिसांशी त्यांनी संपर्क साधावयाचा आहे. नैर्त्रुत्य रेल्वे विभागात या अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे.
नैर्त्रुत्य रेल्वे विभागातील चार रेल्वेंमध्ये हे अभियान राबविले जात आहे. वास्को-हजरत निजामुद्दीन गोवा एक्स्प्रेस, हुबळी-लोकमान्य टिळक एक्स्प्रेस, हुबळी विजयवाडा एक्स्प्रेस व गदग मुंबई एक्स्प्रेस या रेल्वेंमध्ये महिला रेल्वे पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे.
मोबाईलवरून साधता येणार संपर्क
महिलांना रेल्वे प्रवासादरम्यान कोणतीही मदत असल्यास त्यांनी 182 या साहाय्यवाणीशी संपर्क साधायचा आहे. तसेच नैर्त्रुत्य रेल्वेच्या हुबळी विभागाने 70226 26987 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.