नवी दिल्ली \ ऑनलाईन टीम
महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेत्या सुष्मिता देव यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. सुष्मिता देव यांनी पक्षाचा राजीनामा देत असल्याबाबतचं पत्र पक्षाच्याअध्यक्षा सोनिया गांधी यांना पाठवलं आहे. या पत्रात त्यांनी काँग्रेसचे सर्व नेते आणि पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.
सुष्मिता देव यांनी महिला काँग्रेसचं राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवलं आहे. काँग्रेसच्या आघाडीच्या फळीतील नेत्या अशी त्यांची ओळख आहे. त्यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी मोठा झटका मानला जात आहे. सुष्मिता देव यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना सोमवारी सकाळी एक पत्र पाठवलं आहे. आपल्या पत्रालाच राजीनामा समजण्यात यावं, अशी विनंती देखील सुष्मिता देव यांनी केली आहे. आपण काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचं त्यांनी यात नमूद केलं आहे. तसेच, पक्षातील इतर सदस्यांचे, नेत्यांचे त्यांनी आभार मानले आहेत.
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षासोबत गेल्या तीन दशकांचा माझा प्रवास मला कायम लक्षात राहील. या निमित्ताने मी पक्षाचे, पक्षाच्या सर्व नेत्यांचे, सदस्यांचे आणि पक्ष कार्यकर्त्यांचे आभार मानते. माझ्या या प्रवासात तुम्ही सर्वजण माझ्यासोबत होतात, असं आपल्या पत्रात सुष्मिता देव यांनी नमूद केलं आहे. तसेच या पत्रामध्ये त्यांनी सोनिया गांधी यांचे वैयक्तिकरीत्या आभार मानले आहेत. मॅडम, तुम्ही मला दिलेल्या संधीसाठी आणि तुमच्या मार्गदर्शनासाठी मी तुमचे वैयक्तिकरीत्या आभार मानते. हा अनुभव माझ्यासाठी फार महत्त्वाचा होता, असं त्यांनी पत्रात म्हटलं आहे.