सोलापूर / प्रतिनिधी
महिलांवरील अन्यायाविरूद्ध लढणाऱया ज्येष्ठ कार्यकर्त्या आणि हिंदुत्वनिष्ठ अपर्णाताई रामतीर्थकर यांचे मंगळवारी त्यांच्या राहत्या घरी येथे सकाळी 11.45 वाजता निधन झाले आहे. त्या 65 वर्षांच्या होत्या. ज्येष्ठ दिवंगत पत्रकार अरूण रामतीर्थकर यांच्या त्या पत्नी होत्या. त्यांच्यामागे एक पुत्र, सून, नातू असा परिवार आहे. पक्षाघाताच्या झटका आल्याने त्यांच्यावर गेले काही आठवडे उपचार सुरू होते. महिलांना त्यांच्या अधिकारासंबंधी जागृत करण्याचे मोलाचे कार्य त्यांनी केले.
साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही त्यांची जीवनशैली होती. महिला अधिकारांसाठी कार्य करण्याबरोबरच त्यांनी हिंदुत्वाच्या विचारसरणीचाही प्रचार व प्रसार केला. त्यांनी विविध वृत्तपत्रे आणि नियतकालिकांमधून विपुल लेखन या दोन विषयांवर केले आहे. त्यांची पुस्तकेही प्रसिद्ध आहेत. सोलापुरातील पाखर संकुल, उद्योगवर्धिनी आदी संस्थांसाठी त्यांनी अखेरपर्यंत कार्य केले. आपले संपूर्ण मानधन त्यांनी सोलापुरातील पारधी समाजाच्या वंचित मुलांसाठी दिले होते. या मुलांना जीवनाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी आश्रमशाळाही उभी केली आहे.