इंग्लंड संघातील खेळाडूंना कोरोनाचा फटका बसल्याने घेतला निर्णय
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत व इंग्लंड महिला संघांत होणारे एफआयएच प्रो लीग हॉकीमधील सामने लांबणीवर टाकण्यात आले आहेत. इंग्लंड महिला संघातील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्यामुळे हा निर्णय घेतला गेला आहे.
2 व 3 एप्रिल रोजी हे सामने भुवनेश्वरमधील कलिंगा स्टेडियमवर नियोजित करण्यात आले होते. ‘इंग्लिश संघात अनेक खेळाडूंना कोरोनाची बाधा व दुखापतीची समस्या आल्याने हे सामने लांबणीवर टाकण्यात आले आहेत. एफआयएच, हॉकी इंडिया व इंग्लंड हॉकी यांनी परिस्थितीवर लक्ष ठेवले असून या संदर्भात माहिती उपलब्ध झाल्यानंतर ती देण्यात येईल,’ असे एफआयएचने ट्विट केले आहे. ‘प्रो लीगमधील सामन्यांसाठी इंग्लंड महिला संघ भारतात येणार होता, पण संघातील अनेक खेळाडू कोरोना चाचणीत पॉझिटिव्ह आल्याने तसेच काही खेळाडू दुखापतीमुळे उपलब्ध होणार नसल्याने हा दौरा त्यांना रद्द करावा लागला आहे,’ असे हॉकी इंडियाने पत्रकात सांगितले आहे.
महिलांचे सामने लांबणीवर टाकण्यात आले असले तरी पुरुष संघांतील सामने ठरल्याप्रमाणे या आठवडाअखेरीस खेळविले जातील. या संदर्भात बोलताना हॉकी इंडियाचे अध्यक्ष ज्ञानेंद्रो निंगोम्बम म्हणाले की, ‘इंग्लंड महिला संघाला भारताची नियोजित ट्रिप दुर्दैवाने रद्द करावी लागली आहे. महामारीचा हा काळ सर्वांसमोरच आव्हान निर्माण केले आहे. त्याच्याशी सर्वांनाच संघर्ष करावा लागत आहे, हे आम्ही समजू शकतो,’ असे त्यांनी स्पष्ट पेले.
या लीगच्या गुणतक्त्यात भारतीय महिला तिसऱया स्थानावर आहेत. त्यांनी तीन सामने जिंकले, दोन अनिर्णीत राखले व एक सामना गमविला आहे. या प्रो लीगमधील सामने लांबणीवर टाकण्याची भारताची ही पहिलीच वेळ नव्हे. याआधी याच महिन्यात भारताच्या पुरुष संघाचे जर्मनीविरुद्धचे सामने लांबणीवर टाकावे लागले. जर्मनी संघालाही कोरोनाचा फटका बसल्याने हे सामने लांबणीवर टाकावे लागले होते.