चालण्यासाठी करते प्लास्टिकच्या पायाचा वापर
अनेकदा माणूस स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू लागतो. एखादा गंभीर आजार झाल्यावर त्याला शरीराचे महत्त्व समजते. शरीराचा एक अवयव देखील हटविला किंवा त्याला वेगळय़ा प्रकारे शरीरात जोडल्यास माणूस पूर्वीसारखे जगू शकत नाही. या गोष्टीचा जिवंत पुरावा आहे न्युझीलंडची एक महिला जिने कर्करोगावर मात केली, परंतु त्यानंतर तिच्या पायांची स्थिती अत्यंत वाईट झाली.
जेसिका 8 वर्षांची असताना तिला कर्करोग झाल्याचे निदान झाले होते. स्वतःच्या बहिणीसोबत फूटबॉल खेळत असताना तिच्या पायाला प्रॅक्चर झाले होते. डॉक्टरांनी हाड जोडण्याचा प्रयत्न केला, परंतु 4-5 महिन्यानंतर देखील चालताना तिला प्रचंड वेदना व्हायच्या. अधिक तपासणी केली असता तिला ऑस्टियोसार्कोमा म्हणजेच हाडांचा कर्करोग असल्याचे निदान झाले. हाडांची निर्मिती करणाऱया पेशींमध्ये हा कर्करोग होत असतो.
जेसिकाचा जीव वाचविणे हे डॉक्टरांचे प्रमुख लक्ष्य होते, कारण कर्करोग पायापासून वरील अवयवांमध्ये फैलावत होतो. डॉक्टरांकडे दोन पर्याय होते. हिपपासून पाय कापणे, परंतु त्यानंतर नकली पाय बसविणे अवघड ठरले असते. कारण प्रोस्थेटिक लेक गुडघ्यांच्या सहाय्याने बसविण्यात येतो. ज्या पायात कर्करोग आहे, त्याचा चांगला भागच गुडघ्याप्रमाणे वापरण्याचा दुसरा पर्याय होता.
जेसिकाचा जीव वाचविण्यासाठी डॉक्टरांनी हे आव्हान स्वीकारून तिच्या पूर्ण पायाचा खालील हिस्सा अर्धा कापून गुडघ्याच्या जागी बसविला. अशाप्रकारे जेसिकाच्या दुसऱया पायात तिचा तळवा आणि बोट आहेत, ज्याला गुडघ्याप्रमाणे वापरण्यात येते आणि त्याच्याच मदतीने जेसिका प्रोस्थेटिक लेगचा वापर करत आहे.
सोशल मीडियावर लोकप्रिय
जेसिका सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असते, जेथे ती स्वतःच्या या स्थितीशी संबंधित छायाचित्रे आणि चित्रफिती शेअर करत असते. स्वतःचे शरीर आहे तसे स्वीकारण्यासाठी ती आता लोकांना प्रेरित करते. आता ती नृत्य देखील करू शकते. जेसिका आता एक लेखिका झाली असून तिचे मोटिव्हेशन पोस्ट लोकांना अत्यंत आवडत असतात.