वार्ताहर / पालये
मांद्रे मतदारसंघात काँग्रेस पक्ष निष्क्रिय नसून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवरही मांद्रे मतदारसंघात काँग्रेस कार्यकर्ते सक्रिय आहेत. कार्यकर्त्यांना उगाच बदनाम न करता आमदार दयानंद सोपटे यांनी आपला स्वभाव व वर्तन सुधारावे. आगामी विधानसभा निवडणुकीत मांद्रे मतदारसंघातील क्&ाढाँग्रेसचे कार्यकर्ते त्यांना त्यांची जागा दाखवून देतील, असे प्रतिपादन काँग्रेसचे युवा नेते सचिन परब यांनी पत्रकार परिषदेत केले.
आमदार सोपटे यांनी नुकत्याच मांद्रे येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत मांद्रे मतदारसंघातील भाजप पक्षांतर्गत गटबाजी उघड करताना मांद्रे मतदारसंघात विरोधी पक्षाचे अस्तित्व नसल्याचे म्हटले आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी मांद्रे गट काँग्रेस समितीतर्फे या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव प्रमेश मयेकर, प्रदीप हरमलकर, मांद्रे गट काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रणव परब, मांद्रे यूथ काँग्रेसचे सचिव सूरज रेडकर उपस्थित होते.
आमदार सोपटे यांना काँग्रेसने दोनवेळा तिकीट दिली, मात्र त्यांनी काँग्रेस पक्षाचा विश्वासघातच केला. कार्यकर्त्यांना केवळ वापरा आणि फेकून द्या या तत्त्वाप्रमाणे वागवले. दिलेली आश्वासने न पाळल्याने मांद्रे मतदारसंघातील अनेकजण नाराज आहेत. मांद्रे व पालये ग्रामपंचायत त्यांच्या हातातून निसटलेली आहे. पालये ग्रामपंचायतीचा पंचसदस्य सागर तिळवे आपल्याकडे राखून ठेवण्यासाठी त्यांनी पालयेचे पंचसदस्य संदीप न्हानजी यांच्याकडील गोवा फलोत्पादन महामंडळाचे पद काढून घेऊन तिळवे यांना बहाल केले. चांगल्या मनाने हे पद तिळवे यांना बहाल केले असते तर वेगळी गोष्ट होती. मात्र आमदार सोपटे केवळ सुडाचे राजकारण खेळत असल्याचा आरोपही सचिन परब यांनी केला.
मांद्रे मतदारसंघात अनेक गैरसोयी आहेत. पाणी, वीज, रस्ते तसेच अन्य साधनसुविधांची कमतरता आहे. केवळ हायमास्ट दिवे लावलेत म्हणून विकास होणार नाही. आपली शक्ती सूड उगविण्यासाठी खर्ची न घालता आमदारांनी हे विषय प्राधान्यक्रमाने हाती घ्यावेत, असेही श्री. परब म्हणाले.
पाटर्य़ांविरोधात आमदार गप्प : मयेकर
मांद्रेत ड्रग्जला थारा देणार नाही, असे आमदार सोपटे एकीकडे म्हणतात, मात्र मांद्रे मतदारसंघात रेस्टॉरन्टमध्ये पाटर्य़ा रंगत आहेत. लॉकडाऊन काळातही मोरजीत झालेल्या एका रेस्टॉरन्टमधील पार्टीत सुमारे 200-300 विदेशी पर्यटक सहभागी होते. आमदार सोपटेंनी मात्र या पार्टीविरोधात आवाज उठवला नसल्याचा आरोप मयेकर यांनी केला.
मांद्रे मतदारसंघात सचिन परब यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेस पक्ष बळकट होत चाललेला असून मांद्रेत काँग्रेस पक्षाला चांगले भवितव्य असल्याचेही श्री. मयेकर म्हणाले.
सीमा सील कराव्यात : प्रदीप हरमलकर
आज भाजपचा प्रचार केवळ सोशल मीडियावर होत असतो. मात्र कृती शून्य. पेट्रोल व डिझेल दरात वाढ करून सर्वसामान्यांचे जीणे भाजपने हैराण केले आहे. आज गोव्यात कोरानामुळे अनेकांचे बळी पडत असून गोमंतकीयांच्या संरक्षणासाठी सीमा बंद करणे, हाच पर्याय आहे, असे प्रदीप हरमलकर म्हणाले.
गणेश चतुर्थी सणावरही सावट : प्रणव परब
गोव्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच असून सर्व रुग्णांचे कनेक्शन वास्को बनलेले आहे. एवढे असूनही कायच भिवपांचे ना, असे सांगणारे सरकार भीतीपोटीच एक दिवशीय अधिवेशन भरविते, याला काय म्हणावे. कोरोनाच्या वाढत्या केसीसमुळे यंदा गणेश चतुर्थी सण साजरा करता येईल काय, असा संभ्रमावस्थेत गोमंतकीय जनता आहे, असे प्रणव परब म्हणाले.