प्रतिक तुपे/ मौजेदापोली
ताज्या मासळीसाठी प्रसिद्ध असलेल्या हर्णै बंदराने आता ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या कलाकारांनादेखील भुरळ घातली आहे. येथील ताज्या मासळीची चव न्यारीच असून यासाठी पुन्हा पुन्हा आवर्जुन येणार असल्याचे अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने ‘तरूण भारत’शी बोलताना सांगितले.
झी मराठीवर सुरू असलेल्या ‘माझा होशील ना’ या मालिकेचे दापोली तालुक्यातील कर्दे, मुरूड, लाडघर येथे चित्रिकरण सुरू आहे. कर्दे येथील ब्रह्ये कुटुंबियाच्या वाडय़ाचे चित्रिकरण या मालिकेत दाखवणार असून या वाडय़ात मालिकेतील बऱयाच गोष्टींचा उलगडा होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले गौतमी देशपांडे, विराजस कुलकर्णी, सानिका गाडगीळ दापोलीमध्ये आले आहेत. यावेळी त्यांनी ‘तरूण भारत’शी संवाद साधला. या कलाकारांना येथील लाडघर, कर्देच्या किनाऱयासोबतच हर्णै बंदराचीही भूरळ पडली आहे.
शांत समुद्रकिनारे, नारळी पोफळीच्या बागा आणि येथील परखड पण गोड स्वभावाच्या माणसांनी आम्हाला आपलंसं केल्याचे लेखक, निर्माता सुबोध खानोलकर यांनी सांगितले. त्याचबरोबर गौतमी देशपांडे हिने हर्णै बंदर आणि तेथील ताज्या मासळीचा वारंवार उल्लेख करत ताज्या मासळीसाठी तरी हर्णै बंदराला पुन्हा पुन्हा भेट देण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
हर्णै बंदर हे पुणे, मुंबई, सातारा येथील पर्यटकांचे प्रथम पसंतीचे पर्यटन स्थळ आहे. येथील ताजी मासळी आणि विस्तीर्ण व स्वच्छ समुद्रकिनारे यामुळे गोव्यानंतर दापोलीतील किनाऱयांना पर्यटकांची पसंती आहे. त्यामुळे येथील किनारे आणि हर्णै बंदर सुट्टय़ांमध्ये पर्यटकांनी कायम फुललेले असते. याच निसर्ग सौंदर्याचे आता कलाकारांनाही आकर्षण वाटू लागले आहे. ‘माझा होशील ना’ या मालिकेच्या टिमनेही हर्णै बंदराची सफर केली असून ताज्या मासळीचा आस्वादही घेतला आहे.