वैद्यकीय अधिकायांना निवेदन. काम क्लिष्ट.
वार्ताहर / औंध
माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षण करून कुटुंबातील सदस्यांची माहिती अँपमध्ये आँनलाईन भरण्याचे काम अतिशय क्लिष्ट आहे. त्यामुळे या मोहिमेचे सर्वेक्षण करण्यासाठी आशा स्वयंसेविकांनी नकार दिला आहे. याबद्दलचे निवेदन पुसेसावळीप्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आले आहे.
प्रसिध्दीला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की शासनाने आता पर्यंत राबवलेल्या विविध योजनेची कामे आशांनी विनातक्रार केली आहेत. कोरोनाचे काम सुद्धा आम्ही आजही प्रत्यक्ष मैदानात उतरून करीत आहोत. हे काम करताना गावातील काही लोकांनी मानसिक त्रास दिला. सामाजिक बांधिलकी म्हणून कोरोनाचे हाती घेतलेले व्रत आम्ही सोडलेले नाही. सध्या शासनाने माझे कुटुंब माझी जबाबदारी सर्वेक्षणाचे काम सध्या आशांना दिले आहे. हे काम अतिशय क्लिष्ट असून आमच्या आकलन शक्तीच्या पलिकडचे आहे.शिवाय आँनलाईन माहिती भरण्यासाठी आमचेकडे अँड्रॉईड मोबाईल नाहीत. या सर्वेक्षणाचे कसलेही प्रशिक्षण न देता हे काम आमच्यावर लादले आहे.कुटुंबातील सदस्यांचे सर्वेक्षणाच्या कामाची जबाबदारी आम्हाला देऊ नये अशी विनंती निवेदनात केली आहे.निवेदनाच्या प्रती जिल्हा आरोग्य अधिकारी गटविकास अधिकारी खटाव यांना देण्यात आल्या आहेत.