मुंबई ः
अपना बँकेच्या संचालिका मेघना चाळके यांची देवरुख येथील मातृमंदिर या सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षपदी नुकतीच बिनविरोध निवड झाली. यानिमित्त अपना बँकेच्या कर्मचारी पतपेढी व स्पोर्ट्स क्लबच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी अपना बँकेचे दत्ताराम चाळके, अविनाश सरफरे, शांताराम दिवेकर, राजन होंबाळकर, बँकेचे संचालक तसेच कर्मचारी उपस्थित होते.
इंदिराबाई हळबे मावशी यांनी 1954 साली देवरुख पंचक्रोशीतील गोरगरीब महिलांसाठी रुग्णसेवा करण्याच्या दृष्टीने मातृमंदिरची स्थापना केली. गेल्या 68 वर्षात आरोग्य महिला व बालकल्याण, कृषी प्रशिक्षण, अनाथालय, रुग्ण सेवा, प्रा. मधु दंडवते कृषी विद्यालय, कौशल्याधारीत प्रशिक्षण, बालकांसाठी आनंददायी शिक्षणाची बालवाडी आदि विविध उपक्रमांच्या माध्यमातून ह्या परिसरातील शेकडो गावातून ही संस्था काम करीत आहे. संस्थेमार्फत सुपर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल उभे रहात आहे. लवकरच ते कार्यान्वित होईल. देवरुख पंचक्रोशीतील कष्टकरी व गरीब जनतेच्या सेवेकरिता ही संस्था स्थापन झाली. माझ्या आजोळी व सासरी समाजसेवेचे बाळकडू मला मिळाले. या संस्थेत जनतेची सेवा करून तोच वसा पुढे सुरू ठेवण्यास मिळत आहे याचे समाधान वाटते, असे सत्कारप्रसंगी बोलताना मेघना चाळके म्हणाल्या.