कोरोना संसर्गावरील उपचारात मायकोबॅक्टेरियम डब्ल्यू औषधाचे चांगले निष्कर्ष प्राप्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून एम्स भोपाळमध्ये या औषधाची क्लीनिकल ट्रायल सुरू आहे. आतापर्यंत 3 रुग्ण या क्लीनिकल ट्रायलमध्ये बरे झाल्याची माहिती एम्स भोपाळचे संचालक सरमन सिंग यांनी दिली आहे.
कोरोनाबाधातंच्या उपचारात मागील काही दिवसांपासून मायकोबॅक्टेरियम डब्ल्यू ची क्लीनिकल ट्रायल सुरू आहे. या प्रयोगाचे चांगले परिणाम प्राप्त झाले आहेत. लवकरच फेवीपिराविर औषधही कोरोनाबाधितांच्या उपचारार्थ वापरले जाणार आहे. कोरोनबाधितांवर या औषधाचा वापर जपानने याआधीच सुरू केला आहे. मायकोबॅक्टेरियम डब्ल्यू एक लस मानली जायची, परंतु आता त्याला औषध म्हटले जाते. क्लीनिकल ट्रायलमध्ये हे औषध उपयुक्त ठरल्यास कोरोनावरील उपचारात ते अधिकृतपणे वापरण्यात येणार असल्याचे सिंग म्हणाले.
मायकोबॅक्टेरियम डब्ल्यूचा वापर कुष्ठरोगाच्या उपचाराकता केला जातो. ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाकडून कौन्सिल फॉर सायंटिफिक अँड इंडस्ट्रीयल रिसर्चला या औषधाच्या क्लीनिकल ट्रायलला मंजुरी मिळाली आहे. या मंजुरीनंतर एम्स भोपाळसह देशाच्या 3 रुग्णालयांमध्ये या औषधाची चाचणी केली जात आहे. हे औषध रुग्णाची रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यास मदत करते.