कर्मचाऱयांना कार्यालयात बोलविणार : 28 फेब्रुवारीपासून हायब्रिड वर्किंगची सुविधा देणार ः वर्क स्टेशन्स स्थापणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कोरोना संसर्गाच्या तिसऱया लाटेचा प्रभाव सध्या काहीसा कमी होत असल्यामुळे विविध उद्योग व्यवसाय आता गती पकडत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये पहिल्या लॉकडाऊनच्या दरम्यान सुरु करण्यात आलेली वर्क फ्रॉम होमची सुविधा कंपन्या आता हळूहळू मागे घेत असल्याचे दिसून येत आहे. यामध्ये प्रामुख्याने आयटी कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱयांना पुन्हा कार्यालयात बोलविण्यास सुरुवात केली आहे व नव्या उमेदीने काम सुरु करण्यास सांगितल्याचे समजते.
जागतिक पातळीवरील दिग्गज सॉफ्टवेअर क्षेत्रातील कंपनी मायक्रोसॉफ्ट यांनी 28 फेब्रुवारीपासून हायब्रिड वर्किंग सुविधा उपलब्ध करणार असल्याचे म्हटले आहे. कंपनीने याच्याकरीता कर्मचाऱयांना 30 दिवसांचा कालावधी दिला आहे.
कर्मचाऱयांना अधिकचा वाव देणार
मायक्रोसॉफ्ट कंपनीचे मुख्य मार्केटिंग ऑफिसर, क्रिस कॅपोसेला यांनी यावर बोलताना सांगितले आहे, की 28 फेब्रुवारीपासून काम करण्याची नवीन पद्धत हायब्रिड वर्किंगमध्ये परावर्तीत होणार आहे. याच्याकरीता कर्मचाऱयांना 30 दिवसांचा कालावधी दिला जाणार आहे. यात कर्मचाऱयांना अधिकची सवलत देण्यात येणार आहे. यात कधी, केव्हा आणि कसे काम करायचे तसेच सध्या संबंधीत कर्मचाऱयांची आपली कामाची तयारी यावर हा बदल होणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.
काय आहे हायब्रिड वर्किंग?
हायब्रिड वर्कचा अर्थ असा आहे, की वर्क स्टेशनमध्ये बसून जगातील कोणत्याही कंपनीसाठी काम करणे होय. दुसऱया देशातील कंपनीमध्ये आपल्या देशात राहून काम करता येणार आहे. यात प्रत्यक्ष संबंधीत ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. तर कंपनी आपल्या जवळपास एक वर्क स्टेशन बनविणार असल्याची माहिती असून तेथे कर्मचाऱयांना सदरचे ऑफिसचे काम करावे लागणार आहे.