नेक्साच्या ग्राहकांना सेवा उपलब्ध : 30 शहरात सेवा
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशातील आघाडीवरची कार निर्माती कंपनी मारुती सुझुकीने अलीकडेच ऑनलाइन कार वित्त योजनेला सुरुवात केली आहे. ‘स्मार्ट फायनान्स’ नावाने सुरू केलेल्या या योजनेच्या माध्यमातून कंपनीला कार विक्रीमध्ये वाढ करायची आहे. त्यामुळे या योजनेची जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत माहिती पुरवण्याची व्यवस्था मारूती सुझुकीकडून आगामी काळात केली जाईल.
या योजनेअंतर्गत नेक्साच्या ग्राहकांना देशभरातील 30 शहरांमध्ये सेवा देता येणार आहे. ‘स्मार्ट फायनान्स’ या प्लॅटफॉर्मअंतर्गत मारुती सुझुकी आपली वित्तसेवा ग्राहकांसाठी कार्यान्वीत करणार आहे. पुढील वर्षापर्यंत या योजनेचा विस्तार देशभरातील सर्व शहरांपर्यंत करण्याचा इरादा कंपनीने केला आहे. या सेवेच्या माध्यमातून ग्राहकांना कार खरेदीबाबत वित्त योजनांची माहिती करून दिली जाणार आहे. कारसाठी कर्जाच्या विविध योजनांची माहिती देऊन त्याबाबतच्या आवश्यक पत्रांची माहितीही दिली जाणार आहे.