वार्ताहर / कंग्राळी बुद्रुक
शेतातील थ्री फेज विद्युत पंप सुरू करताना शॉक लागून मृत्युमुखी पडलेल्या मारुती रामचंद्र पवार यांच्या कुटुंबियांना हेस्कॉम खात्याकडून पाच लाख रुपयाचा मदतीचा धनादेश ग्रामीणच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या हस्ते शनिवारी सुपूर्द करण्यात आला. त्यामुळे कुटुंबियांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
सदर धनादेश हेस्कॉमच्या फंडातून आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या प्रयत्नाने मयताच्या कुटुंबियांना मिळवून दिल्याचे यावेळी सांगण्यात आले.
गेल्या सहा महिन्यापूर्वी मयत मारुती पवार हे आपल्या शेतातील भाजीपाला पिकाला पाणी देण्यासाठी गेले होते. त्यावेळी पंपसेट सुरू करताना शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला होता. घरचा कर्ता अचानक गेल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांची परिस्थिती हालाखीची बनली होती. हेस्कॉमने आर्थिक मदत केल्यामुळे कुटुंबियांसह सर्व सामान्यातून समाधान व्यक्त करण्यात येत
आहे.
यावेळी मारुती पवारची आई यल्लुबाई, पत्नी मनीषा, मुलगी निकिता व रेखा, मुलगा रोहित, भाऊ नागेश, काका शिवाजी पवार यांना भेटून त्यांचे सांत्वन केले. मुलांच्या शिक्षणासाठी किंवा इतर मदतीसाठी मदत करण्याचे आश्वासन आमदार हेब्बाळकर यांनी यावेळी
दिले.
यावेळी हेस्कॉमचे अधिकारी हमन्नावर, हेस्कॉम कामगार युनियन संघटना उपाध्यक्ष नाथाजी पाटील, ग्रा. पं. माजी अध्यक्ष दत्ता पाटील, ग्रा. पं. माजी सदस्य जयराम पाटील, अनिल पावशे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकर पुंडलिक पाटील, शंकर अष्टेकर, अजित पटाणे, निंगाप्पा बेळगावी, अर्चना पटाणे, गोपाळ पाटील, शंकर कोनेरी, मोहन भैरटकर, उमेश पाटील, नारायण पाटील, नितीन पवार, प्रशांत पवार, प्रभाकर बेळगावकरसह इतर शेतकरी उपस्थित होते.