सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त सेवाभावी व्यक्तींचा सन्मान
प्रतिनिधी / बेळगाव
मार्केट पोलीस स्थानकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षपूर्तीचे औचित्य साधून बेळगाव नगरीतील सेवाभावी व्यक्तींचा सन्मान करण्यात आला. मार्केट पोलीस ठाण्याचे सीपीआय संगमेश शिवयोगी आणि एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्या हस्ते सेवाभावी व्यक्तींचा शाल, पुष्पहार आणि फळे देऊन सन्मान करण्यात आला.
पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी नरसप्पा मेलक्की यांना मुख्यमंत्री पदक देऊन गौरविण्यात आल्याबद्दल त्यांचा एसीपी कट्टीमनी यांच्या हस्ते तर सामाजिक ऋण फेडण्यासाठी 100 हून अधिक वेळा रक्तदान करणारे सेवाभावी कार्यकर्ते आणि शांतता समितीचे सदस्य संजय पाटील यांचा सीपीआय संगमेश शिवयोगी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी अन्य व्यावसायिक आणि सेवाभावी कार्यकर्ते तसेच शांतता समिती सदस्य यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना सीपीआय संगमेश शिवयोगी यांनी सेवाभावी कार्यकर्त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच पोलीस सामाजिक शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच कटिबद्ध असतील, अशी ग्वाही दिली. याप्रसंगी पोलीस कर्मचारी उपस्थित होते.