रात्री उशिरापर्यंत कामकाज सुरू
प्रतिनिधी /बेळगाव
चालू आर्थिक वर्ष पूर्ण होण्यास अवघे दोन दिवस शिल्लक असल्यामुळे बँका व कार्यालयांमध्ये धूम पहायला मिळत आहे. एरव्ही वेळच्यावेळी बंद होणाऱया बँका व सरकारी कार्यालये आता रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे दिसत आहे. खाते, कर्जदार, गुंतवणूकदार, व्यवहारांसंबधी माहिती गोळा करण्यासाठी कर्मचाऱयांची धावपळ सुरू आहे. अजून 2 ते 3 दिवस ही धावपळ सुरू राहणार आहे.
31 मार्चपर्यंत जुन्या आर्थिक वर्षातील व्यवहार बंद करून 1 एप्रिलपासून नवीन आर्थिक व्यवहारांना सुरुवात होते. त्यामुळे बँकिंग क्षेत्राशी निगडित सर्व व्यवहार 31 मार्चपूर्वी बंद करावे लागतात. मार्च एंडिंगच्या क्लोजिंगसाठी सरकारी कार्यालयांमध्येही धावपळ सुरू आहे. प्रत्येक कार्यालयाला वर्षभरातील आर्थिक व्यवहारांची माहिती द्यावी लागते. त्यामुळे सरकारी कर्मचारीही कधी नव्हे इतके कामात दिसत आहेत.
तीन दिवस बँका राहणार बंद
शुक्रवार दि. 1 रोजी बॅंकांचे इयर्ली क्लोजिंग असल्यामुळे बँकांचे कामकाज सुरू राहील. परंतु ग्राहकांना सेवा मिळणार नाही. शनिवार दि. 2 रोजी गुढीपाडवा असल्याने बँकांना सुटी असणार आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असणार आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करणाऱयांना बुधवार व गुरुवार या दोन दिवसांमध्ये काम करावे लागणार आहे.
बँक, सोसायटय़ांचे कर्मचारी कर्ज वसुलीला
नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्यापूर्वी जुनी कर्जे भरा, असे सांगण्यासाठी बँक व सोसायटय़ांचे कर्मचारी दिसत आहेत. कर्जदाराच्या घरी अथवा फर्मवर जाऊन कर्ज भरण्यास सांगण्यात येत आहे. ग्रामीण भागात तर सकाळी 7 वाजल्यापासूनच कर्ज वसुलीसाठी कर्मचारी जात आहेत. सकाळच्या सत्रात कर्जवसुली व त्यानंतर बँकेतील काम कर्मचाऱयांना करावे लागत आहे.