मेक्सिकोत महामारीमुळे आतापर्यंत 1300 आरोग्यकर्मचारी दगावले : जगभरात 2 कोटी 40 लाख 90 हजार रुग्ण
नाकावाटे दिल्या जाणाऱया लसीची उंदरांवर चाचणी : रोगप्रतिकारकशक्ती वाढली, विषाणूचा संसर्ग रोखण्यास यश
जगभरात कोरोना विषाणूची लागण आतापर्यंत 2,40,90,754 जणांना झाली आहे. यातील 1 कोटी 66 लाख 32 हजार 383 रुग्ण बरे झाले आहेत. तर 8 लाख 24 हजार 162 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. मालदीवचे माजी अध्यक्ष मौमून अब्दुल गयूम यांना कोरोनाची बाधा झाली आहे. मौमून हे 30 वर्षांपर्यंत मालदीवचे अध्यक्ष राहिले आहेत. आरोग्य अधिकाऱयांनी चालू आठवडय़ात राजधानी मालेमध्ये संसर्ग फैलावण्याचा इशारा दिला होता. मालेमध्ये ऑगस्ट महिन्यात 100 पेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत 7 हजारांहून अधिक रुग्ण आढळले असून 28 जणांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी नाकावाटे डोस देता येणारी कोविड-19 वरील लस विकसित केली आहे. या लसीची उंदरांवर चाचणी झाली असून त्याचे प्रभावी परिणाम समोर आले आहे. वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कुल ऑफ मेडिसीनच्या संशोधकांनी ही लस विकसित केली आहे. लसीचा डोस देण्यात आल्यावर उंदरांमध्ये रोगप्रतिकारकशक्ती आणि विषाणूशी लढणारी न्यूट्रिलायजिंग अँटीबॉडीज वाढली आहे. तसेच याचा लाभ नाक आणि श्वसनतंत्रावर दिसून आल्याचे वैज्ञानिकांनी म्हटले आहे.
नाकावाटे डोस
वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी ऑफ मेडिसीनचे संशोधक एस. डायमंड यांच्यानुसार या लसीचा डोस उंदरांमध्ये संसर्ग रोखण्यास यशस्वी ठरला आहे. डोस दिल्यावर नाकाच्या वरील हिस्स्याची इम्युनिटी विकसित झाली आणि कोरोनाचा प्रवेश बंद झाला आहे. आतापर्यंतचे परिणाम सकारात्मक राहिल्याचे त्यांनी म्हटले आहे.
1 किंवा 2 डोस पुरेसे
जर्नल सेलमध्ये प्रकाशित संशोधनानुसार कोरोनाने बाधित उंदरांना लसीचा डोस देण्यात आला होता. लस दिल्यावर उंदरांमधील इम्यून रिस्पॉन्स वेगाने वाढल्याचे चाचणीत दिसून आले आहे. लस फुफ्फुसांमध्ये संसर्ग, सूज आणि कोरोनाच्या धोक्यांपासून वाचविते. सर्वसाधारणपणे लसीचे एक किंवा दोन डोस पुरेसे आहेत, परंतु उदंरांच्या फुफ्फुसंमध्ये आढळून आलेला विषाणू अत्याधिक क्षमतेचा असल्याने त्यांना अधिक डोस द्यावे लागले आहेत.
पहिल्या डोसपासून…
संशोधक मायकल यांच्यानुसार लसीच्या पहिल्या डोसपासूनच उंदरांमध्ये विषाणूच्या विरोधात लढणाऱया न्यूट्रिलायजिंग अँटीबॉडीची पातळी वाढली आहे. लस कोरोना विषाणूपासून वाचविण्यासह त्याचा संसर्ग रोखण्याची क्षमता बाळगून असल्याचे आतापर्यंतचे परिणाम दर्शवितात. लसीच्या मदतीने उदंरांना संसर्गापासून वाचविणे शक्य झाले आहे.
पुनर्संसर्ग नाही
लसीचा प्रभाव दीर्घकाळापर्यंत राहिला आहे. उंदरांमधील संसर्ग संपुष्टात आल्यावर परत विषाणूच्या संपर्कात आल्यावरही त्यांना पुन्हा संसर्ग झाला नाही. लवकरच आम्ही अन्य प्राण्यांवर या लसीची चाचणी करणार आहोत. ही लस विषाणू रोखण्यास सहाय्यभूत ठरण्यासह महामारीची व्याप्ती कमी करू शकेल, अशी अपेक्षा असल्याचे संशोधक मायकल यांनी म्हटले आहे.
अमेरिकेतील शाळा, महाविद्यालयांमध्ये संकट
अमेरिकेत शाळा आणि महाविद्यालये सुरू केल्यापासून आतापर्यंत 24 प्रांतांच्या महाविद्यालयांमध्ये संसर्गाची प्रकरणे आढळून आली आहेत. बाधितांमध्ये 3,300 विद्यार्थी आणि कर्मचारीवर्ग सामील आहे. मिसीसिपी प्रांतात सुमारे 4 हजार विद्यार्थी आणि 600 शिक्षकांना विलगीकृत करण्यात आले आहे. तेथे केवळ 17 ते 21 ऑगस्टदरम्यानच शाळांमध्ये शिकविणारे 144 शिक्षक आणि 292 विद्यार्थी बाधित आढळले आहेत. 31 शाळांमध्ये रुग्ण सापडल्याने तेथील विद्यार्थी आणि कर्मचाऱयांना विलगीकृत करण्यात आल्याची माहिती प्रांताचे आरोग्य अधिकारी डॉ. थॉमस ई. डॉब्स यांनी दिली आहे.
आरोग्य कर्मचाऱयांचे बलिदान
मेक्सिकोत महामारी फैलावल्यापासून 1300 पेक्षा अधिक आरोग्य कर्मचाऱयांचा मृत्यू झाल्याची माहिती उप-आरोग्यमंत्री ह्यूगो लोपेझ यांनी बुधवारी दिली आहे. मागील 24 तासांमध्ये 4,916 रुग्ण सापडले असून 650 जणांना जीव गमवावा लागला आहे. याचबरोबर देशातील एकूण रुग्णसंख्या 5 लाख 68 हजार 621 झाली आहे. तेथे आतापर्यंत 61,450 बळी गेले आहेत.
अर्जेंटीना : रुग्ण वाढतेच
अर्जेंटीनामध्ये दिवसभरात 8,771 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात प्रतिदिन आढळून येणाऱया रुग्णांचे हे सर्वाधिक प्रमाण आहे. मागील 24 तासांत देशात 197 बळी गेले आहेत. याचबरोबर देशातील एकूण रुग्णसंख्या आता 3 लाख 59 हजार 638 झाली आहे. तर देशात 7,563 जणांचा मृत्यू ओढवला आहे.
बोल्सोनारोंच्या पुत्राला लागण
ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो यांचे पुत्र आणि खासदार फ्लॅवियो यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. फ्लॅवियो यांच्यात सध्या कुठलीच लक्षणे दिसून आलेली नाहीत, ते घरातूनच कामकाज हाताळतील, अशी माहिती त्यांच्या माध्यम सचिवाने दिली आहे. मागील 24 तासांमध्ये देशात 47 हजार 134 रुग्ण सापडले असून 1,271 जणांचा मृत्यू ओढवला आहे. ब्राझीलमधील बाधितांचे प्रमाण आता 36,74,176 झाले आहे. तर 1,16,666 जणांचा मृत्यू झाला आहे.
इराक : 2 लाखापार
इराकमध्ये मागील 24 तासांमध्ये 3,962 नवे रुग्ण सापडले असून 77 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील बाधितांचा आकडा आता 2 लाख 11 हजार 947 झाला आहे. तर 6,596 जणांना जीव गमवावा लागला आहे. लस तयार करणाऱया कुठल्याही देशासोबत मिळून काम करण्यासाठी तयार असल्याचे आरोग्य मंत्री हसन अल तमिमि यांनी सांगितले आहे. इराकमध्ये 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना लसीकरता प्राधान्य दिले जाणार आहे.
सोलमधील शाळा बंद
दक्षिण कोरियाची राजधानी सोलमध्ये संसर्ग पुन्हा वाढू लागला आहे. वाढता संसर्ग पाहता सरकारने राजधानीमधील सर्व शाळा बंद करण्याचा आदेश दिला आहे. तेथे मागील 2 आठवडय़ांमध्ये सुमारे 200 कर्मचारी आणि विद्यार्थ्यांना लागण झाली आहे. देशातील बहुतांश शाळा 20 मे आणि 1 जूननंतर सुरू करण्यात आल्या होत्या.
शाळांमध्ये मास्क अनिवार्य नाही
शाळांमध्ये मुलांसाठी मास्कचा वापर अनिवार्य नसल्याचे ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी स्पष्ट केले आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी याची घोषणा त्यांनी केली आहे. तत्पूर्वी मागील आठवडय़ात जॉन्सन यांनी वर्गात मुलांना मास्क परिधान करणे अनिवार्य राहणार असल्याचे म्हटले होते. तसेच मुलांना शाळेत पाठविण्याचे आवाहन त्यांनी पालकांना केले होते. ब्रिटनमध्ये आतापर्यंत 3 लाख 27 हजारांपेक्षा अधिक रुग्ण सापडले असून 41 हजारांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.