प्रतिनिधी / मालवण:
मालवण नगरपरिषदेच्यावतीने शहरातील दिव्यांग बांधवांना 9 लाख रुपये दिव्यांग निधीचे वितरण करण्यात आले आहे.
यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर निधी लवकर मिळावा, अशी मागणी शहरातील दिव्यांग बांधवांनी पालिकेकडे केली होती. या पार्श्वभूमीवर पालिकेच्यावतीने तात्काळ कार्यवाही पूर्ण करत 110 दिव्यांग बांधवांच्या खात्यात निधी जमा केला आहे, अशी माहिती नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी दिली.
बांधील खर्च वजा जाता नप महसूल उत्पन्नाच्या 5 टक्के निधी दिव्यांगांसाठी अनुज्ञेय आहे. कोरोना लॉकडाऊन पार्श्वभूमी लक्षात घेता यावर्षी लवकरात लवकर निधी जमा करावा, अशी मागणी नगराध्यक्षांकडे करण्यात आली होती. त्या दृष्टीने सकारात्मक विचार करून शहरातील सुमारे 110 दिव्यांग बांधवांना 9 लाख 5 हजार वाटप करण्यात आला आहे. यामध्ये 80 ते 100 टक्के दिव्यांग – 15 हजार, 60 ते 80 टक्के दिव्यांग – 10 हजार, 40 ते 60 टक्के दिव्यांग – 5 हजार अशाप्रकारे रक्कम दिव्यांगांच्या खात्यावर जमा करण्याचे आदेश प्रशासनास देण्यात आले आहेत. कोणी अपंग बांधव या निधीपासून वंचित राहिले असल्यास त्यानी आवश्यक कागदपत्रे घेऊन मालवण नगरपरिषद प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहनही नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी केले आहे.
दिव्यांग संघटनेने मानले आभार
दिव्यांग बांधवांना दिव्यांग निधीचा जास्तीत जास्त लाभ व्हावा. यासाठी सिंधुदुर्ग दिव्यांग संघटना मालवण शहराच्यावतीने प्रशासन स्तरावर नेहमीच आग्रही भूमिका मांडण्यात आली. यावर्षी कोरोना पार्श्वभूमीवर परिस्थितीचा विचार करून लवकर निधी जमा व्हावा. ही मागणी करण्यात आली होती. मागणीची दखल घेत ती तात्काळ पूर्ण केल्याबद्दल संघटनेचे मालवण शहर अध्यक्ष सत्यम पाटील यांनी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर व पालिकेचे आभार मानले आहेत.