वार्ताहर /माशेल
माशेल येथील श्री देवकीकृष्ण देवस्थानचा देऊळवाडा माशेल स्थानिकांतर्फे प्रसिद्ध आषाढी द्वादशीला साजरा केला जाणारा चिखल काल्याचा उत्सव उत्साहाने साजरा करण्यात आला.
देवकीकृष्ण मैदानावर झालेल्या या उत्सवात परिसरातील सर्व विद्यालयांना चिखल काल्याच्या निमित्ताने सुटटी् दिल्याने व भाविकांनी खास एका दिवसाची रजा घेतल्याने लहानापासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंतच्या भाविकांचा यात सहभाग होता.
आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात चालत असलेल्या 24 तासांच्या पारंपारिक श्री विठ्ठल सप्ताहाची समाप्ती झाल्यानंतर प्रज्वलीत केलेल्या समईतील तेल अंगाला लावून परिसरातील हरिभक्तांनी ‘जय जय विठ्ठल जय हरि विठ्ठल नामाच्या’ गजरात मैदानावर उतरून, मृदंग व टाळाच्या तालात पारंपारिक क्रीडांना प्रारंभ केला. त्यांनी श्रीकृष्णाच्या बाल लीला सादर करून अनेक मनोरंजक खेळ खेळले. चिखल काल्याचा आगळा वेगळा कार्यक्रम पाहण्यासाठी शेकडो रसिक माशेलमध्ये आले होते. यात पर्यटकांचाही समावेश होता. गेल्या कित्येक वर्षांच्या तुलनेत यंदा भरपूर पाऊस पडल्याने मैदानावर भरपूर चिखल झाल्याने यंदा खेळाची जास्तच रंगत वाढली. दीड तासांच्या चिखलातील खेळानंतर दही हंडी फोडून त्यानंतर मंदिरात जाऊन आरत्या झाल्यावर चिखल काल्याची सांगता झाली.