ऑनलाईन टीम / मुंबई :
मासिक पाळीच्या काळात महिलांना बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो. शारीरिक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारे महिलांवर या काळात परिणाम होत असतात. या काळात महिलांनी खरंतर आराम करणे अपेक्षित असते, पण काही कारणास्तव म्हणा किंवा नाईलाजाने ते शक्य होत नाही.
यावर एका प्रसिद्ध भारतीय कंपनीने उपाय काढला आहे. भारतातील झोमॅटो या कंपनीने मासिक पाळीच्या काळात त्यांच्यासाठी काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना वर्षभरात दहा सुट्ट्या देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारतामध्ये मासिक पाळीबाबत असणारे न्यूनगंड आणि एकंदरच परिस्थिती पाहता कंपनी या निर्णयावर पोहोचल्याचे म्हटले जात आहे.
याबाबत बोलताना झोमॅटोचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी सांगितले की,’मासिक पाळी दरम्यान सुट्टी मागण्यास कोणताही संकोचलेपणा किंवा लाज नसली पाहिजे, तसेच तुम्ही मासिक पाळीसाठी सुट्टी घेत असल्याचे अंतर्गत विभागांमध्ये काम करणाऱ्यांना सांगण्यात हरकत नसल्याचे मत त्यांनी मांडले.
दरम्यान, जवळपास 5 हजार कर्मचारी झोमॅटोमध्ये कार्यरत आहेत. कर्मचाऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या सेवेसाठी या कंपनीची विशेष ओळख आहे. त्यांच्या या निर्णयावर आता सर्वच स्तरांतून चर्चा सुरु असून, या निर्णयाचे स्वागत होत आहे. शिवाय इतर कंपन्यांनीही असा निर्णय घ्यावा अशी मागणी काही स्तरातून केली जात आहे.