सर्जेकोट खाडीपात्रातील घटना : वाचविण्यासाठी गेलेली नौकाही उलटही : नऊ मच्छीमारांना वाचविण्यात यश
एक तासाचा थरार, जीव वाचविण्यासाठी धडपड
प्रतिनिधी / मालवण:
सर्जेकोट खाडीपात्रात मासेमारीस गेलेली नौका पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत जाऊन समुद्राच्या मुखाजवळ बुडाली. नौकेतील चार मच्छीमार पाण्यात फेकले गेले. त्यांना वाचवण्यास गेलेली दुसरी नौकाही लाटांच्या तडाख्यात बुडाली. दोन्ही नौकेवरील नऊ मच्छीमारांनी तासभर पोहत किनारा गाठला. यात अत्यवस्थ बनलेल्या दोघा मच्छीमारांना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी आणले असून दिवाकर जानू देऊलकर (26, रा. सर्जेकोट मालवण) हा मच्छीमार समुद्रात बेपत्ता झाला आहे. ही घटना शनिवारी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडली.
सर्जेकोट येथील यशवंत देऊलकर यांच्या मालकीची ‘मोरया’ ही मासेमारी नौका घेऊन शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परेश फोंडबा, रमेश देऊलकर, केशव फोंडबा, दिवाकर देऊलकर हे चारजण सर्जेकोट खाडीत मासेमारीस गेले होते. पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबर पात समुद्राच्या बाजुने खेचली गेली व पलटी झाली. चारहीजण खाडीच्या पाण्यात फेकले गेले. वाचविण्यासाठी मच्छीमारांनी आरडाओरडा सुरू केली. लगेचच राजेश देऊलकर यांची ‘कार्तिक’ ही पात घेऊन काही मच्छीमार मदतीसाठी धावले. मात्र, पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाचविण्यासाठी गेलेली पातही उलटली. सर्वजण पाण्यात फेकले गेले. पोहत जाऊन काहींनी किनारा गाठला. बुडालेल्या बोटीवरील चारपैकी तीनजण व वाचविण्यास गेलेल्या कार्तिक बोटीवरील राजेश देऊलकर, रजनीकांत देऊलकर, प्रसाद आडकर, नूतन पेडणेकर, किशोर कांदळगावकर, यशवंत देऊलकर, प्रशांत जामसंडेकर यांनी किनारा गाठला. बचाव कार्यासाठी काही मच्छीमार ग्रामस्थ सहभागी झाले. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अजय पाटणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. मदतकार्याच्या सूचना केल्या. ग्रामपंचायत व ग्रामस्थही मदतकार्यात सहभागी होते. यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाबी जोगी, दिलीप घारे, रविकिरण तोरसकर आदी बचावकार्यात सहभागी झाले होते.
दोघांवर रुग्णालयात उपचार सुरू
खाडीपात्रात बुडलेल्यांपैकी केशव फोंडबा व त्यांना वाचवण्यास गेलेल्यांपैकी यशवंत देऊलकर यांची तब्बेत पाण्याच्या बाहेर आल्यावर काहीशी गंभीर बनली. त्यांना तातडीने मालवण रुग्णालयात दाखल करून उपचार सुरू करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱयांनी दिली. पोलीस प्रशासनानेही घटनेची माहिती घेत जबाब नोंद केला आहे. डॉ. बालाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार करण्यात आले.
एक मच्छीमार बेपत्ता
खाडीपात्रात बुडालेल्या मोरया बोटीवरील दिवाकर जानू देऊलकर हा तरुण खाडी व समुद्रात बेपत्ता झाला आहे. त्याला शोधण्यासाठी बचावकार्य सुरू होते. तर बुडालेली मोयरा मासेमारी नौकाही तळाशिल परिसरात दिसून आल्याचे बोलले जात आहे. दिवसभर दिवाकर आणि बोटीचा मच्छीमार शोध घेत होते. मोरया बोटीवरील मच्छीमारांना वाचविण्यासाठी गेलेल्या कार्तिक नौकाही समुद्राच्या लाटांमध्ये फसून पलटी झाली. यामुळे दहा मच्छीमारांचा जीवनमरणाचा संघर्ष समुद्रात सुरू झाला होता. समुद्राच्या अजस्त्र लाटांना सामोरे जात तब्बल एक तास पोहत किनारा गाठला. तर नंतर मच्छीमारांनी कार्तिक बोटही समुद्राच्या पाण्यातून बाहेर काढली आहे.
दुर्घटनाग्रस्त मोरया नौका सापडली
सर्जेकोट खाडीपात्रात दुर्घटनाग्रस्त झालेल्या ‘कार्तिक’ पाठोपाठ ‘मोरया’ या मासेमारी नौका किनाऱयावर आणण्यात स्थानिक मच्छीमारांना यश आले. मात्र या दोन्ही नौकांवरील मासेमारी जाळी वाहून गेली होती. तसेच बेपत्ता दिवाकर देऊलकर या युवकाचा शोध लागू शकला नव्हता. सायंकाळी उशिरापर्यंत ही शोध मोहीम सुरू होती. दरम्यान रविवारी ड्रोन कॅमेऱयाच्या सहाय्याने दिवाकरचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे समजते. या दुर्घटनेमुळे सर्जेकोट गावावर शोककळा पसरली आहे.