साडेपाच लाखांच्या कर्जापोटी 16 लाख रुपये व्याजाची मागणी, चौघांवर गुन्हा
प्रतिनिधी / मिरज
किराणा दुकानाच्या व्यवसायासाठी घेतलेल्या साडेपाच लाख रुपयांच्या कर्जापोटी 16 लाख रुपयांचे व्याज देण्याचा तगादा लावून चौघा खासगी सावकारांनी विशाल विजय शेटे (वय 37, रा. आशा टॉकीजसमोर, मिरज) या किराणा धान्य व्यापाऱ्याचा छळ सुरू केला आहे. सदर व्यापाऱ्याने पोलिसात तक्रार दिली असून, विष्णू विक्रम माने (रा. मिरज) याच्यासह चौघांवर शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
विशाल शेटे यांचे महापालिकेसमोर नवकार ट्रेडर्स नावाने किराणा दुकान आहे. व्यवसायिक कारणासाठी त्यांनी विष्णू माने या खासगी सावकाराकडून साडेपाच लाख रुपये 15 टक्के व्याज दराने कर्ज घेतले होते. यापैकी दोन लाख, 33 हजार, पाचशे रुपयांची परतफेडही केली होती. मात्र, विष्णू माने याने आणखी 16 लाख रुपये येणेबाकी आहे, असे म्हणून वसूलीचा तगादा सुरू केला होता.
विशाल शेटे यांचा वारंवार छळ करुन अश्लिल शिवीगाळ आणि मारहाण करण्यात येत होती. या त्रासाला कंटाळून ते बेपत्ता झाले होते. मात्र, या खासगी सावकारांनी नवकार ट्रेडर्स या किराणा दुकानात येऊन त्यांचे वडील विजय शेटे यांनाही मारहाण करुन धमकी दिली. कर्जाचे आणि व्याजाचे पैसे न दिल्यास तुमच्या मुलाचा भावपूर्ण श्रध्दाजंली असा बोर्ड लागेल, अशी धमकी दिली असल्याची तक्रार विशाल शेटे यांनी शहर पोलिसात दिली आहे. त्यानुसार विष्णू माने याच्यासह चौघांवर गुन्हा दाखल झाला आहे.