गणपती बाप्पा मोरया… कोरोनाला हरवूया . -जिल्हय़ात 36 हजारांहून अधिक मूर्तींचे विसर्जन
प्रतिनिधी/ रत्नागिरी
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ ची आळवणी करत मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर लाडक्या बाप्पाला जिल्हावासियांनी जड अंतःकरणाने निरोप दिला. जिल्हय़ाच्या विविध भागात कोरोनाच्या पार्श्वभुमीवर नियमांचे पालन करत वाद्य, मिरवणूक, जल्लोषाला फाटा देत गणेश विसर्जन करण्यात आले. जिल्हय़ातील 36 हजार 700 घरगुती तर 48 सार्वजनिक गणपतींना भक्तीभावाने निरोप देण्यात आला. यावेळी गणपती बाप्पा मोरया… कोरोनाला हरवूया… अशाच सर्वाच्या भावना होत्या.
यावर्षी कोरोनाचा प्रभावाखाली गणेशमूर्ती आगमन झाले. विसर्जन सोहळे देखील त्याच साधेपणाने मात्र भक्तीमय वातावरणात पार पडले. जिल्ह्य़ात सुमारे 1 लाख 66 हजार 660 गणपतींची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. दिड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, वामन द्वादशीच्या मुहुर्तावरील गणपती विसर्जनानंतर मंगळवारी अनंत चतुर्दशीच्या मुहुर्तावर उर्वरीत बहुतांश गणरायांना निरोप देण्यात आला.
या विसर्जन सोहोळयावेळी देखील कुठेही ढोल-ताशांचा दणदणाट नव्हता. फक्त गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त साद आणि जगावर ओढवलेले कोरोनाचे विघ्न दूर करण्याचे साकडे घातले गेले. दुपारपासूनच कुटुंबीयांच्या उपस्थितीत गणरायाचे विसर्जनाला प्रारंभ झाला. पावसानेही विश्रांती घेतल्याने सायंकाळी उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळे व घरगुती गणपतींचे विसर्जन सुरू होते.
रत्नागिरीत प्रामुख्याने मांडवी चौपाटीवर मोठय़ा प्रमाणात विसर्जन करण्यात आले. मात्र यावेळेस दरवर्षीप्रमाणे गर्दी नव्हती. काही घरगुती गणपतींचे भाटय़े, पांढरासमुद्र, किल्ला, मिऱया येथेही विसर्जन करण्यात आले. त्यावेळी नगर परिषद कर्मचारी, जीवरक्षक व सुरक्षारक्षकदेखील तैनात करण्यात आले होते. यावेळी आकर्षक मूर्ती कॅमेऱयात कैद करून प्रत्येक क्षण सोशल नेटवर्किंगवर शेअर करण्याचा आटापिटाही सुरु होता. शहरात कृत्रिम तलावांमध्ये विसर्जनालाही चांगला प्रतिसाद मिळाला. स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांच्या मदतीने विसर्जन केले जात होते.
चिपळुणात कृत्रिम तलावांना पसंती
मंगळवारी चिपळूण तालुक्यात सात सार्वजनिक गणरायांसह 6 हजार 212 घरगुती गणरायांना निरोप देण्यात आला. नगर परिषदेने तयार केलेल्या चार फिरत्या कृत्रिम तलावांना यावेळीही चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारपूल, बहाद्दूरशेखनाका, रामतीर्थ, गांधारेश्वर, आदी ठिकाणी गणरायांचे विसर्जन करण्यात आले. याग्नत चिपळूण पोलीस स्थानक विभागातील 5 हजार 081 घरगुती, चिपळूणचा महाराजा, भाजी मंडई, राहूल गार्डन, खेर्डी येथील दोन, बहादूरशेखनाका अशा 6 सार्वजनिक, अलोंरे विभागातील 350 घरगुती, एक सार्वजनिक, सावर्डेतील 781 घरगुती गणरायांचा समावेश होता.