प्रतिनिधी / बेळगाव
कॅसलरॉक ते वास्को-द-गामा या दरम्यान रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण केले जाणार आहे. यासाठी कोणत्याही प्रकारे पर्यावरणाचा ऱहास होणार नाही, याची खबरदारी घेण्यात आली आहे. यासाठी कोणतीही अतिरिक्त जमीन संपादित केली जाणार नसून सागरी मार्ग वाहतुकीला चालना देण्यासाठी हा मार्ग गरजेचा आहे, अशी माहिती नैर्त्रुत्य रेल्वेचे अतिरिक्त व्यवस्थापकीय संचालक पी. के. मिश्रा यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली.
बुधवारी पी. के. मिश्रा यांनी व्हर्च्युअल पद्धतीने पत्रकार परिषद घेऊन गोव्याच्या दुपदरीकरणाविषयी माहिती दिली. ते पुढे म्हणाले, कमीत कमी झाडांची कटाई या दुपदरीकरणाच्या कामावेळी केली जाणार आहे. बेंगळूरच्या इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स या संस्थेने पर्यावरणीयदृष्टय़ा सर्वेक्षणदेखील केले आहे. गोव्याच्या विकासासाठी रेल्वे मंत्रालयाकडून हा प्रकल्प राबविला जात आहे. दुपदरीकरणासोबतच विद्युतीकरण केले जाणार असल्यामुळे कमीत कमी प्रदूषण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कर्नाटकातील होस्पेट ते वास्को-द-गामा अशा एकूण 342 कि.मी.चे दुपदरीकरण केले जात आहे. 2010-11 मध्ये यासाठी 2 हजार 127 कोटी रुपये मंजूर करण्यात आले होते. सागरीमार्गाद्वारे गोव्यामध्ये मोठय़ा प्रमाणात माल वाहतूक होते. रेल्वेतून आलेला माल लोंढामार्गे हुबळी व बेळगावकडे पोहोचविणे सहज शक्मय होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रकल्प व्यवस्थापक पी. के. क्षत्रिय, हुबळी विभागाचे अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक एस. के. झा, हुबळी विभागाच्या ई. विजया आदी उपस्थित होते.