प्रतिनिधी/ सातारा
कोविड 19 अनुशंगाने संपुर्ण जग कोरोना विशाणुच्या विळख्यात अडकले आहे. मार्च पासून भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव ही जाणवत आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्हयात प्रशासन मोठया प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे. सातारा जिल्हयात ही कोरोना बाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
सातारा शहरात पहिले लॉकडाऊन सुरू झाल्या पासून श्री. राजेंद्र चोरगे यांच्या संकल्पनेतून शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक तसेच व्यापारी क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी एकत्र येवून मीच माझ्या सातारकरांचा रक्षक या सामाजिक संस्थेची स्थापना केली. लॉकडाऊन काळामध्ये विविध मार्गाने अनेक नागरिकांना संस्थेच्या माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्यात आली.
सदर संस्थेच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सातत्याने उपक्रम राबविले जात आहेत. सुरूवातीच्या टप्प्यात संपूर्ण सातारा शहर आणि परिसरातील दीड लाख नागरिकांची घरोघरी जावून ऑक्सीजन पातळी व शारीरिक तापमान मोजण्यात आले. तसेच कोरोना संदर्भातील जागृती करणारे पत्रके देवून कोरोना आजाराची भीती काढण्याचा उपक्रम राबविण्यात आला. रोगप्रतिकार शक्तीवर्धक गोळयांचे वाटप केले. तसेच शहरात निर्जुंतुकीकरण करण्यासाठी विविध भागात फवारणी करण्यात आली.
त्या नंतरच्या टप्प्यात फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील तज्ञ व्यक्तीचे कोरोना संदर्भातील मार्गदर्शन 21 सत्रात फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जगभरातील नागरिकांना उपलब्ध करून दिले. तसेच वाढत्या प्रादुर्भावामुळे रूग्णांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सीजन बेड उपलब्ध होत नसलेले रूग्णांची हेळसांड थांबवण्यासाठी मोफत पोर्टेबल ऑक्सीजन मशीन उपचारासाठी घरी देण्यात आले.
शासनाने घालून दिलेल्या विविध नियमांचे पालन करताना नागरिकांच्यात सातत्य राहत नसल्याचे निदर्शनास येत आहेत. याच अनुशंगाने दैनंदिन कामे करताना सामाजिक अंतर राखणे, मास्क व्यवस्थित घालणे, दुकानातील – रस्त्यावरील गर्दीवर मर्यादा ठेवणे इ. सूचना ध्वनिक्षेपकाच्या माध्यमातून चौकाचौकात थांबून नागरिकांच्यात जागरूकता राखण्यासाठी सवयभान उपक्रमाची सुरूवात चौथ्या टप्यापासून करण्यात आली असून या उपक्रमामुळे नागरिक सतर्क राहण्यास मदत होणार आहे.
सदर ’सवयभान‘ उपक्रमाची सुरूवात शहर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अण्णासाहेब मांजरे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी श्री. राजेंद्र चोरगे, संस्थेचे अध्यक्ष श्री. वसंत जोशी, श्री. जयेंद्र चव्हाण, सचिव श्री. मनोज देशमुख, श्री. शेखर घोडके, श्री. श्रिणिक शहा , श्री. यशवंत गायकवाड, श्री. सुयश लुणावत, श्री. महेश लोया व इतर मान्यवर उपस्थित होते.