कोल्हापूर \ ऑनलाईन टीम
मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनास सुरुवात झाली आहे. या मराठा मोर्चाला सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, शिवसेना खासदार धैर्यशील माने, खासदार संजय मंडलिक यासारख्या सर्व आमदार-खासदारांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.मी मोर्चात नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून सहभागी झालो आहे, अशी भूमिका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी मांडली.
यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा चंद्रकांत पाटील म्हणाले की, मी मोर्चात नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून सहभागी झालो आहे. मराठा समाजासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल. येत्या अधिवेशनात सरकारने मराठा आरक्षणाबद्दल मूलभूत मागण्या मान्य कराव्या, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली.
५ जुलैपासून विधानसभा आणि विधानपरिषद अधिवेशन आहे, त्याआधी राज्यातील लोकप्रतिनिधींना अशाप्रकारे बोलतं करणं उपयोगी राहील. यामुळे पहिल्याच दिवशी मराठा आरक्षणाला दिलेल्या सवलती तातडीने सुरु करा आणि आरक्षण मिळण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरु करा असं सगळ्या लोकप्रतिनिधींनी म्हटलं पाहिजे, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. मी या ठिकाणी कोल्हापूरचा नागरिक म्हणून आलो आहे सांगताना त्यामुळे संभाजीराजेंसमोर जर काही भूमिका मांडायची असेल तर ती मी पुण्यात मांडेन अशी माहिती चंद्रकांत पाटलांनी यावेळी दिली.