ऑनलाईन टीम / पुणे :
कोरोना विषाणूचा संसर्ग सर्वत्र वाढत आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका व्यवस्थापन, रुग्णालयातील बेड व्यवस्थापन आणि डॉक्टर याबाबतचे नियोजन संगणकीय प्रणालीव्दारे करा तसेच पुणे व पिंपरी चिंचवड येथे मुंबईच्या धर्तीवर तातडीच्या रुग्णालयांची उभारणी करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी दिले. शासकीय विश्रामगृह येथे कोरोना विषाणू प्रादुर्भाव निर्मुलन आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, पुणे शहरासह जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्न करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत हा प्रादुर्भाव आणखी वाढणार नाही, याची काळजी घेण्याची गरज आहे, कोरोनाच्या संकटावर नियंत्रण मिळविण्यासाठी नियोजन महत्त्वाचे आहे. नवीन रुग्णांची भर पडणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे, तसेच संस्थात्मक क्वारंटाईन ठिकाणी आवश्यक सुविधा नागरिकांना उपलब्ध करून द्याव्यात, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यात मुंबईत प्रशासनाला यश आले आहे, त्याच धर्तीवर पुण्यात उपाययोजना राबविण्याची गरज असल्याचे सांगून पुढे पवार म्हणाले की, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजनासोबतच कोरोना चाचणी, रुग्णवाहिका, हॉस्पीटलचे बेड व्यवस्थापन, डॉक्टरचे नियोजन या सर्व महत्वाच्या उपाययोजनांचे संगणकीय प्रणालीच्या मदतीने नियोजन करा, त्यामुळे नियोजनात आणखी सुसुत्रता येईल.
तसेच कंटेनमेंट झोननिहाय उपाययोजनांची पाहणी करा तसेच पुणे, पिंपरी चिंचवड व पुणे ग्रामिण क्षेत्र मिळून एकाच पातळीवरून नियोजन करा, कोरोना संसर्ग रोखण्यासाठी निधीची कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे सांगतानाच कोणत्याही परिस्थितीत उपचाराची गरज असलेल्या नागरिकाना उपचार मिळालेच पाहीजेत, असे स्पष्ट निर्देशही पवार यांनी दिले.