- अनलॉकची नवीन नियमावली ठाकरे सरकारकडून जाहीर
ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने शिथिल केले जात आहे. दरम्यान राज्य सरकारने मेट्रो आणि ग्रंथालये देखील सुरु करण्यासाठी परवानगी दिली आहे. यासंदर्भात राज्य सरकारकडून आज नवीन परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले.
या नवीन नियमावलीत मात्र, शाळा-कॉलेज 31 ऑक्टोबरपर्यंत बंदच राहणार आहेत. असे असले तरी, शिक्षकांना 50 टक्के उपस्थितीची मुभा देण्यात आली आहे.
दरम्यान, राज्य सरकारने आज जारी केलेल्या नव्या नियमावलीत मात्र, धार्मिकस्थळे उघडण्याबाबतचे कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही.
अनलॉक-5 मध्ये सरकारने बार, रेस्टॉरंट, हॉटेल आणि मॉल यांना उघडण्यास सशर्त परवानगी दिली होती. त्यानंतर ग्रंथालये सुरु करण्याची मागणी केली जात होती. त्यामुळे सरकारने जारी केलेल्या नव्या नियमावलीनुसार राज्यभरातील ग्रंथालये सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
यासोबतच ठाकरे सरकारने सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरु ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्याचबरोबर 15 ऑक्टोबर पासून कन्टोनमेंट झोन बाहेर आठवडी बाजार देखील सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.