ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईत नुकतीच लोकल सेवा सुरू करण्यात आली. त्यानंतर कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी पुन्हा एकदा लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत.
महापौर पेडणेकर म्हणाल्या ,’वाढती रुग्णसंख्या ही चिंतेचीच बाब आहे. बहुतांश लोक मास्कविना लोकलमधून प्रवास करत आहेत. लोकांनी खबरदारी घ्यायला हवी, अन्यथा आपण पुन्हा एकदा लॉकडाऊनकडे जाऊ. लॉकडाऊन लागू करायचा की, नाही?, हे सर्वस्वी लोकांच्याच हातात आहे’, असे देखील त्यांनी यावेळी नमूद केले आहे.
पुढे त्या म्हणाल्या, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रत्येकाने स्वतः ची, स्वतः च्या कुटुंबाची काळजी स्वतः च घेतली पाहिजे. आपण सर्वांनी मिळून आवश्यक ती काळजी घेतली तर आपण कोरोनाची दुसरी लाट रोखू शकू. लोकांनी नियमांचे पालन केले नाही, व्यवस्थित ती काळजी घेतली नाही अशी अशा प्रकारचे रुग्ण संख्या वाढत राहिली, तर मुंबई महापालिका आणि राज्य सरकारला लॉक डाऊन पुन्हा सुरू करावे लागेल असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.