ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबईच्या वांद्रे परिसरातून गुन्हे शाखेने 1 कोटी 18 लाख रुपये किंमतीचा तब्बल 3 किलो 960 ग्रॅम चरस जप्त केला आहे. कारवाईदरम्यान, दोन महिला हे चरस विकत असल्याचे समोर आले. किशोरी गवळी आणि जोहराबी शेख अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोन महिला तस्करांची नावे असून, त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
वांद्रेच्या चिचंवाडी वाटर फिल्टर रोड, चायना गेट हॉटेलजवळ चरसचा साठा लपवून ठेवण्यात आला होता. त्याची माहिती गुन्हे शाखा युनिट 7 च्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलीसांनी छापा टाकत चरसचा साठा जप्त केला. ताब्यात घेतलेल्या दोन्ही महिलांची कसून चौकशी सुरू आहे. मुंबईच्या विविध भागातून चरस तस्करीसाठी या दोन महिलांकडे येत असल्याचे देखील या तपासात समोर आले आहे.