ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र एटीएस आणि मुंबई क्राइम ब्रांचने आज पहाटे जोगेश्वरीमधून झाकीर नामक एका संशयित दहशतवाद्याला अटक केली. हा दहशतवादी दिल्ली पोलिसांनी यापूर्वी विविध राज्यातृन अटक केलेल्या सहा दहशतवाद्यांच्या संपर्कात होता. या दहशतवादी गटाने मुंबई लोकलवर विषारी गॅस हल्ला करण्याचा कट रचल्याची माहिती झाकीरच्या चौकशीतून समोर आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते. दरम्यान, गुप्तचर यंत्रणांच्या सूचनेनुसार रेल्वे पोलीस सतर्क झाले असून, मुंबई लोकलवरील सुरक्षा यंत्रणा वाढविण्यात आली आहे.
आतापर्यंत अटक करण्यात आलेल्या 7 दहशतवाद्यांचे मुंबई लोकल सॉफ्ट टार्गेट होते. लोकल टेनमध्ये विषारी गॅस हल्ला करून किंवा गर्दीच्या स्थानकांवर भरधाव गाडी घुसवून प्रवाशांना चिरडण्याचा कट रचण्यात आला आहे. त्यासाठी या दहशतवाद्यांनी रेकीही केली असल्याचे सांगण्यात येते. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवरील मुख्य प्रवेशद्वार वगळता सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत. तसेच संशयास्पद व्यक्तींची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे.