वृत्तसंस्था/ मुंबई
इंडियन सुपर लीग फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया मुंबई सिटी एफसी संघाच्या फुटबॉलपटूंनी शनिवारी येथे बालदिन साजरा करताना खास ऑलिंपिक भारत ऍथलीट्सशी संपर्क साधत त्यांना शुभेच्छा दिल्या.
मुंबई सिटी एफसी संघातील फुटबॉलपटूंनी शनिवारी 14 नोव्हेंबर रोजी बालदिन एका वेगळय़ा ढंगात साजरा करण्याचे ठरविले होते. या कार्यक्रमामध्ये मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंना ऑलिंपिक खास ऍथलीट्सशी संपर्क साधून त्यांच्याकडून बरेच काही शिकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. भारताचा आंतरराष्ट्रीय आणि अनुभवी फुटबॉलपटू मंदार राव देसाई, मुंबई सिटी संघाचे प्रमुख प्रशिक्षक सर्जीओ लोबेरा तसेच मॅन्युअल सायबेरा यांच्याशी संपर्क साधला गेला. 2020-21 इंडियन सुपर लीग हंगामासाठी मुंबई सिटी एफसीच्या फुटबॉलपटूंनी खास ऍथलीट्सशी संवाद साधताना विविध विषयावर चर्चा केली. या कार्यक्रमामध्ये भारताच्या खास ऑलिंपिक फुटबॉलपटूंच्या शैलीचे प्रात्यक्षिके दाखविण्यात आली. आगामी इंडियन सुपर लीग फुटबॉल हंगामात मुंबई सिटी एफसी संघाचा सलामीचा सामना 21 नोव्हेंबरला नॉर्थ इस्ट युनायटेड एफसी संघाबरोबर गोव्यात होणार आहे.