पंजाबच्या ऍडव्होकेट जनरल दयोल यांचा राजीनामा
वृत्तसंस्था/ चंदीगड
पंजाबमध्ये ऍडव्होकेट जनरल एपीएस दयोल यांची नियुक्ती वादग्रस्त ठरली होती. त्यांच्या नियुक्तीला सर्वात अधिक विरोध काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंह सिद्धू यांनीच केला होता. दयोल यांनी सोमवारी राजीनामा देताच या वादाची अखेर होण्याची चिन्हे आहेत. तसेच काँग्रेस आणि मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी यांनी सिद्धू यांची मागणी मान्य केल्याचेही स्पष्ट झाले आहे.
चन्नी सरकारकडून दयोल यांच्या नियुक्तीनंतर सिद्धू अत्यंत नाराज झाले होते. त्यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. ऍडव्होकेट दयोल यांनी अवमानाच्या प्रकरणी न्यायालयात युक्तिवाद केला होता. माजी पोलीस महासंचालक सुमेध सिंह यांचा खटलाही त्यांनी लढविला होता. पक्षाने सिद्धू यांचा राजीनामा मंजूर केला नव्हता. मागण्या मान्य केल्यावरच राजीनामा मागे घेणार असल्याचे सिद्धू यांनी सांगितले होते.
दयोल यांना ऍडव्होकेट जनरलपदी नियुक्त करण्यास सिद्धू यांचा विरोध होता. पण चन्नी यांनी स्वतःच्या प्रभावाचा वापर करत ही नियुक्ती केली होती. पण दयोल यांच्या राजीनाम्यानंतर चन्नी गटाला माघार घ्यावी लागल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे राज्यातील राजकारणात आता सिद्धू गट वरचढ ठरल्याचे चित्र आहे.
दयोल यांनी सोमवारी मुख्यमंत्री चन्नी यांची भेट घेतली होती. तर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यावर अतुल नंदा यांनी ऍडव्होकेट जनरल पदाचा त्वरित राजीनामा दिला होता. त्यानंतरच दयोल यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली होती.