त्रिपुराचे मुख्यमंत्री सुदैवाने बचावले
वृत्तसंस्था/ अगरतळा
त्रिपुराचे मुख्यमंत्री विप्लव कुमार देव यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांना अटक करण्यात आली आहे. एक भरधाव कार सुरक्षेला मुख्यमंत्र्यांच्या भेदून वाहनांच्या ताफ्यात शिरली होती. या घटनेत एक सुरक्षा कर्मचारी जखमी झाला होता.
मुख्यमंत्री देव हे स्वतःच्या शासकीय निवासस्थानानजीक गुरुवारी संध्याकाळी फिरण्यासाठी बाहेर पडले होते. त्यादरम्यान कारमधून तिघेजण त्यांच्या सुरक्षेच्या चक्रात पोहोचल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा पथकाने कार रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्यात यश आले नव्हते. शहरातील केरचाऊमुहानी येथून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांची कारही जप्त करण्यात आली आहे. तिन्ही आरोपींना शुक्रवारी मुख्य न्यायदंडाधिकाऱयांसमोर हजर करण्यात आले असता 14 दिवसांच्या कोठडीत रवानगी करण्यात आली. तिन्ही आरोपींचे वय 20 वर्षांपेक्षा अधिक असून त्यांच्या हेतूविषयी काहीच समजले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. चौकशीदरम्यान त्यांचा हेतू जाणून घेण्याचा प्रयत्न पोलीस करणरा आहेत.
तिन्ही युवकांनी संचारबंदी नियमांचे उल्लंघन करण्यासह 6 पोलीस बॅरिकेड्सचे नुकसान केले आहे. याचबरोबर मद्याच्या नशेत असणाऱया या तिन्ही युवकांनी एका पोलीस कर्मचाऱयावर हल्ला केला होता.
तिघांच्या विरोधात वाहन भरधाव चालविणे, शासकीय कर्मचाऱयांच्या कर्तव्यात अडथळा आणणे, शासकीय कर्मचाऱयांना जाणूनबुजून जखमी करणे, मुख्यमंत्र्यांच्या हत्येच्या प्रयत्नांसह विविध आरोपांखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांची कार तसेच मोबाईल जप्त करत त्यांच्या निवासस्थानी छापे टाकले आहेत.