पणजीः मुरगाव येथील माजी मंत्री शेख हसन हरून यांचे सुपुत्र मोहिद्दीन शेख यांनी मंगळवारी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. टीएमसीचा राजिनामा देवून त्यांनी राज्याच्या प्रगतीसाठी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.तसेच मतांचे विभाजन होवू देवू नका असे आवाहन करताना, नेत्यांनी टीएमसी सोडून पुन्हा यावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मुरगावचे उमेदवार संकल्प आमोणकर, आल्तनो गोम्स, शेख हसन, शरद चोपडेकर, नजीर खान, हिमांशू तिवरेकर आदी उपस्थित होते.
मोहिद्दीन हसन शेख यांच्यासह साकिब शेख, मसूद शेख, अमन शेख, इश्फाक मुन्शी यांनीही काँग्रेस प्रवेश केला.
“मी तृणमूल मध्ये प्रवेश केला होता कारण मला तो पक्ष सुद्धा काँग्रेससारखाच आहे असे वाटले होते. पण तेथील वातावरण वेगळे होते. त्यामुळे मी राजीनामा देऊन पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मी इतर नेत्यांना काँग्रेसमध्ये परत येण्याचे आवाहन करतो.’’ असे मोहिद्दीन शेख म्हणाले. संकल्प आमोणकर यांना निवडून आणण्यासाठी काम करणार असल्याचे शेख यांनी सांगितले.