क्रीडा प्रतिनिधी / मडगाव
आयएसएल फुटबॉल स्पर्धेत अग्रस्थानावर असलेल्या मुंबई सिटी एफसीने आणखी एका विजयाची नोंद करताना ईस्ट बंगालला एकमेव गोलने पराभूत केले. वास्कोच्या टिळक मैदानावर खेळविण्यात आलेल्या या सामन्यातील निर्णायक गोल मुर्तादा फॉलने पूर्वार्धात केली.
मुंबई सिटी एफसीचा बचावफळीतील सेनेगलचा 33 वर्षीय खेळाडू मुर्तादा फॉलने 27व्या मिनिटाला गोल करून पहिल्या सत्रात आघाडी घेतली होती. ही आघाडी मुंबईने कायम राखली. त्यांनी यंदाच्या मोसमात आठव्यांदा क्लीन शीट राखली आहे. सलामीला नॉर्थईस्ट युनायटेडविरूद्ध पराभवाचा धक्का बसल्यानंतर हा संघ अपराजित आहे.
मुंबई सिटीचे आता 12 सामन्यांतून नऊ विजय, दोन बरोबरी व एका पराभवाने 29 गुण झाले असून त्यांनी आपली आघाडी पाच गुणांनी वाढविली आहे. एटीके मोहन बागान दुसऱया स्थानावर असून त्यांचे 12 सामन्यांतून 24 गुण झाले आहेत. एफसी गोवा 19 गुणांनी तिसऱया तर हैदराबाद एफसी संघ 17 गुणांनी चौथ्या स्थानावर आहेत. ईस्ट बंगालला तेराव्या सामन्यात पाचवा पराभव स्वीकारावा लागला. दोन विजय व सहा बरोबरीने त्यांचे 12 गुण झाले व ते दहाव्या स्थानावर आहेत. पहिल्या सत्रात मुंबई सिटी एफसीच्या ऍडम फोंड्रा, हय़ुगो बूमोस यांचे गोल करण्याचे यत्न थोडक्यात हुकले. पहिल्या सत्रात केवळ एकदाच ईस्ट बंगालने मुंबईचा बचाव भेदला, मात्र यावेळी जॅकीस माघोमाने हाणलेला फटका दिशाहीन ठरला. 27व्या मिनिटाला मुंबईने विजयी गोल केला. बूमोसच्या क्रॉसवर मुर्तादा फॉलने हेडरवर देबजित मजुमदारला चकविले व चेंडू जाळीत टोलविला. या सामन्यात मुंबई सिटी एफसीच्या खेळाडूंचा 60 टक्के चेंडूवर ताबा राहिला. दुसऱया सत्रात ईस्ट बंगालने आरंभालाच दोन बदल करताना सूरचंद्र सिंग व अंकीतला वगळून मोहम्मद रफीक व राणा घरोमी यांना स्थान दिले. 57 व्या मिनिटाला अहमद जोहूच्या पासवर मुर्तादा फॉलचा फटका देबजित मजुमदारने अडविला.