महामार्गावर तेर्सेबांबर्डे येथील हृदयद्रावक घटना : बंद इमारतीला ट्रकची धडक
उत्तरप्रदेशहून गोव्याला निघाला होता ट्रक : लोखंडी पट्टय़ांची केली जात होती वाहतूक : इमारत जमीनदोस्त, चालक केबिनमध्ये अडकला
वार्ताहर / कुडाळ:
लोखंडी पट्टय़ा घेऊन गोव्याच्या दिशेने वाहतूक करणाऱया मालवाहू ट्रकने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर तेर्सेबांबर्डे-मळावाडी येथे रस्त्याच्या नजीकच असलेल्या स्लॅबच्या जुन्या बंद इमारतीला जोरात धडक दिली. यात ट्रकच्या केबिनचा चक्काचूर होऊन चालक हिरालाल घनश्याम सिंह (50, रा. हातरस-उत्तरप्रदेश) आत अडकले. वेदनांनी विव्हळत असलेल्या हिरालाल यांना तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर बाहेर काढण्यात आले. पण काही वेळापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे लक्षात आले. ही घटना शुक्रवारी रात्री 11.20 वाजता घडली.
क्लिनर असणारा त्यांचा मुलगा अमृतपाल सिंह (22) हा सुदैवाने वाचला. हिरालाल आत अडकल्याने वेदनांनी विव्हळत होते. आपल्याला बाहेर काढा, अशी याचना करीत होते. वडिलांच्या वेदना डोळय़ांदेखत पाहून मुलगा अमृतपाल ‘पापा-पापा’ करून आक्रोश करीत होता. तो अस्वस्थ झाला होता. त्यांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू होते. अखेर अमृतपाल वडिलांना बिलगला. त्यांनीही मुलाला घट्ट पकडले. मात्र, नंतर काही क्षणातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हे दृश्य पाहून सारेच हेलावून गेले.
हिरालाल सिंह आपल्या मालकीचा मालवाहू ट्रक लोखंडी पट्टय़ा भरून 24 एप्रिल रोजी सिकंदराबाद-उत्तरप्रदेश येथून गोवा येथे जाण्यासाठी निघाले. त्यांचा मुलगा अमृतपाल हा क्लिनर म्हणून त्यांच्यासोबत होता. शुक्रवारी सायंकाळी 7.30 वाजण्याच्या सुमारास फोंडा-कणकवली येथे त्यांनी जेवण केले आणि ते गोव्याला निघाले.
ट्रकवरील नियंत्रण सुटून इमारतीला धडक
रात्री 11.20 वाजण्याच्या सुमारास महामार्गावर तेर्सेबांबर्डे-मळावाडी येथे हिरालाल यांना रस्त्याचा अंदाज न आल्याने त्यांचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. ट्रक रस्त्याच्या बाहेर जात अगदी नजीक महामार्ग प्राधिकरणने चौपदरीकरणासाठी संपादित केलेल्या जागेतील स्लॅबच्या जुन्या इमारतीला जाऊन जोरात आदळला. ही धडक एवढी जबरदस्त होती की, ट्रकच्या केबिनचा पूर्णत: चक्काचूर झाला, तर ती स्लॅबची इमारत पूर्णत: जमीनदोस्त झाली.
मुलगा सुदैवाने वाचला
हिरालाल ट्रकच्या केबिनमध्ये अडकले. केबिनचा स्टेअरिंगकडील दर्शनी भाग आत गेला, तर हौद्यातील लोखंडी पट्टय़ा समोर येऊन त्यांचा आसनावर भार पडला आणि आसन दबले गेल्याने ते आत अडकले, तर मुलगा अमृतपाल बाहेर फेकला गेल्याने तो सुदैवाने वाचला. त्याला किरकोळ दुखापत झाली.
हिरालालना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
धडकेनंतर मोठा आवाज आल्याने तेर्सेबांबर्डे-मळावाडी येथील युवकांनी तेथे धाव घेत मदतीसाठी धावपळ सुरू केली. कुडाळ पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. दिलीप बिल्डकॉन कंपनीचा जेसीबी व वाटवे (पावशी) यांची क्रेन मागविण्यात आली. हिरालाल यांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू झाले. हौद्यातील लोखंडी पट्टय़ा बाहेर काढण्यात आल्या.
मदतकार्यात सर्वांचा सहभाग
हिरालाल यांना असहय़ वेदना होत होत्या. आपल्याला बाहेर काढा, असे ते सांगत होते. तीन तासानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र, त्यांचा काही वेळापूर्वीच मृत्यू झाला होता. दिलीप बिल्डकॉनचे कामगार, कुडाळमधील काही युवक, पोलीस तसेच तेर्सेबांबर्डे व बिबवणे ग्रामस्थांनी मदतकार्यात भाग घेतला.
मृतदेह ओरोसच्या शवागृहात ठेवला
हिरालाल यांचा मृतदेह ओरोस येथील शवागृहात ठेवण्यात आला आहे. घटनेची खबर अमृतपाल सिंह याने पोलिसांत दिली. हवालदार माने यांनी पंचनामा केला.