कोरोना योध्दांसाठी केली प्रार्थना
प्रतिनिधी / पणजी
देशात कोविड-19 च्या उदेक दरम्यान मुस्लिम बांधवांनी त्यांच्या घरीच नमाजची प्रार्थना करुन ‘ईद-उल-फितर’ साजरा केला. यादरम्यान त्यांनी कोरोनाशी झूंझ देणारे कोराना योध्दासाठी देखील प्रार्थना केली.
अखिल गोवा मुस्लिम जमात असोसिएशनने कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे लोकांना घरातच राहून नमाज करण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे राज्यातील जवळपास सर्व मशिदींमध्ये शुकशुकाहट पाहायला मिळाला.
यावेळी अखिल गोवा मुस्लिम जमात असोसिएशनचे अध्यक्ष बशीर शेख यांनी सांगितले की, पणजी, बेती येथील असलेल्या मशिदींमध्ये यादिवशी सुमारे पाच हजार ते सहा हजार मुस्लिम बांधव नमाजची प्रार्थना करायचे परंतु आज तिथे कोणीही नव्हते. घरीच नमाज प्रार्थना करण्यात आली.
आम्ही लोकांना विनंती केली होती की गोवा राज्यभरात कोणत्याही मशिदी किंवा ईदगाह येथे नमाज होणार नाही. आम्ही आमच्या बांधवांना त्यांच्या कुटूंबातील सदस्यांसह आपापल्या घरातूनच ‘चश्त नमाज’ नफल देण्याची विनंती केली होती. लॉकडाऊन दरम्यान बंदी घालण्याबाबत एमएचएनने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वांचे अनुसरण करण्याचे आवाहन सह बांधवांना केले होते. असेही शेख यांनी अधिक माहीती देताना सांगितले.