आमदार विजय सरदेसाई यांचे फातोर्डातील मेळाव्यात उद्गार : फातोर्डातील 400 एसटी युवकांचा गोवा फॉरवर्डमध्ये प्रवेश
प्रतिनिधी /मडगाव
गोमंतकीयांना न्याय व विविध संधी देणे हे आपल्या पक्षाचे प्रथम कर्तव्य असल्याचे गोवा फॉरवर्ड पक्षाचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी रविवारी सांगितले. गोमंतकीयांचे हित जपण्यासाठी आम्ही काँग्रेससोबत युती केली आहे. आम्हाला सरकार बनवण्याची संधी द्या. तसे झाल्यास आम्ही तुम्हा सर्वांसाठी काम करू शकू, असे ते म्हणाले.
गोवा फॉरवर्ड पक्षाच्या वतीने रविवारी फातोर्डा येथे ‘मूळ गोंयकारांचो एकवट’ मेळावा आयोजित केला होता. यावेळी गोवा फॉरवर्ड गट अध्यक्ष पीटर फर्नांडिस, नगरसेविका निमिषा फालेरो, पी. आल्वारीस, तियात्र कलाकार डॉरेटी, फ्रान्सिस पिंटो आणि इतर उपस्थित होते. यावेळी अनुसूचित जमातींतील 400 युवक गोवा फॉरवर्डमध्ये सामील झाले. सरदेसाई म्हणाले की, त्यांनी गोवा, गोमंतकीय आणि गोमंतकीयत्व राखण्यासाठी गोवा फॉरवर्डची स्थापना केली. ‘आम्ही बंगाल फॉरवर्ड नेण्यासाठी किंवा दिल्ली फॉरवर्डसाठी नाही. आम्ही आमच्या गोमंतकीयांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी येथे आहोत. मूळ गोमंतकीयांसाठी आमच्याकडे ठोस योजना आहेत, असे ते म्हणाले.
भाजपकडून बिगरगोमंतकीयांच्या फायद्याचे काम
भाजपने भूमिपुत्र विधेयक आणून झोपडपट्टीत राहणाऱया लोकांची मते मिळवण्याचा प्रयत्न केला. परंतु आम्ही त्याच्या विरोधात आवाज उठवला आणि सरकारला कायदा करण्याची प्रक्रिया थांबवण्यास भाग पाडले, असे सरदेसाई म्हणाले. भाजपने गोव्यात गांजा लागवडीला चालना देण्याचा प्रयत्न केला. भाजप सरकार फक्त बिगरगोमंतकीयांच्या फायद्याचे काम करत आहे. यामुळे आम्ही आमची अस्मिता जपण्यासाठी एकजूट राखण्याची गरज आहे, असे सरदेसाई म्हणाले.
नोकऱया कशा देणार ?
भाजप आता सरकारी नोकऱया देण्याचे आश्वासन देऊन लोकांवर भुरळ घालत आहे, ही केवळ मते मिळविण्याची राजकीय खेळी आहे. निवडणूक आचारसंहिता लवकरच लागू होईल. मग नोकऱया कशा देणार, असा प्रश्न त्यांनी केला. सरदेसाई पुढे म्हणाले की, कोविड महामारीच्या दरम्यान ऑक्सिजन न मिळाल्याने अनेकांचा मृत्यू झाला. गोव्यातील लोकांचे प्राण वाचवण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत पूर्णपणे अपयशी ठरले.
अनुसूचित जमातींची नेहमीच साथ
सरदेसाई म्हणाले की, अनुसूचित जमातींनी त्यांना नेहमीच साथ दिली आहे. त्यांना आमदार आणि मंत्रीही केले. तुम्ही दिलेले प्रेम आणि पाठिंबा मी कधीही विसरणार नाही, असे ते म्हणाले. एसटी लोकांच्या व्यवसाय आणि उदरनिर्वाहासाठी अनेक प्रयत्न केले जात आहेत. आम्ही एक ऍप सुरू करू, जे लोकांना फायदे देण्यासाठी उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस आणि गोवा फॉरवर्डचे सरकार आल्यावर तियात्र आणि फुटबॉल क्षेत्रालाही पुढे नेले जाईल.
10 वर्षांत फातोर्डाचा खूप विकास
डॉरेटी म्हणाल्या की, गेल्या 10 वर्षांत फातोर्डामध्ये खूप विकास झाला आहे. फातोर्डामध्ये महिलांना सुरक्षित वाटते. कारण येथे पोलीस स्थानक आहे आणि सर्व भागांत पोलिसांची गस्त असते, असे त्या म्हणाल्या. फातोर्डा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरदेसाई यांनी केलेल्या प्रयत्नांचे अल्वारीस यांनी कौतुक केले. अनेक चांगले प्रकल्प आणून त्यांनी खूप विकास केला आहे, असे ते म्हणाले. यावेळी पीटर फर्नांडिस, नगरसेविका फालेरो आदींचीही भाषणे झाली.
भाजपाला घरी पाठविण्यासाठी युती सरदेसाई यावेळी म्हणाले की, भाजपला घरी पाठवण्यासाठी त्यांनी काँग्रेससोबत युती केली आहे. भाजपकडे त्यांच्या कोळशाच्या व्यापारातून आणि इतर व्यवहारांतून भरपूर पैसा आहे. तो पैसा ते निवडणुकीसाठी वापरत आहेत, असा दावा त्यांनी केला. टीएमसी पक्ष बंगालींना मतांसाठी गोव्यात आणत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. टीएमसी येथे आमची मते विभागण्यासाठी आलेला आहे, ज्याचा फायदा ते भाजपला मिळवून देऊ इच्छितात, अशी टीका सरदेसाई यांनी केली.