कोविड तसेच नैसर्गिक मृत्यू झालेल्या वकिलांच्या कुटुंबीयांचा समावेश
प्रतिनिधी /बेळगाव
कोविड तसेच नैसर्गिक मृत्यू झालेल्या वकिलांच्या कुटुंबीयांना राज्य बार कौन्सिलतर्फे आर्थिक मदत केली जाते. अशा मृत्यू झालेल्या वकिलांच्या कुटुंबीयांनी राज्य बार कौन्सिलकडे अर्ज केले होते. त्या अर्जावर चर्चा करून राज्यातील 195 वकिलांच्या कुटुंबीयांना 8 कोटी 30 लाख 35 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.
राज्यभरातील वकिलांकडून वकालतवर लावण्यात येत असलेल्या तिकिटांमधून जी रक्कम जमा होते ती वकिलांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांना दिली जाते. निवृत्त झाल्यानंतरही ती रक्कम संबंधित वकिलांना दिली जाते. काहीवेळा अचानक मृत्यू होतो. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांना ती रक्कम देण्यात येते. वकील जितकी वर्षे सेवा करतात त्यानुसार ही रक्कम वितरित केली जाते, अशी माहिती कर्नाटक राज्य बार कौन्सिलचे सदस्य ऍड. विनय मांगलेकर यांनी दिली.
कोरोनाकाळात वकिलांनाही लागण झाली. त्यामुळे राज्य बार असोसिएशनने त्यांना आर्थिक मदत केली आहे. ज्या वकिलांनी घरामध्ये उपचार घेतले त्यांना 25 हजार रुपये तर हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या वकिलांना 50 हजार रुपये दिले गेले आहेत. काही वकिलांचा कोरोनामुळे मृत्यूही झाला आहे. याचबरोबर वृद्धापकाळानेही काही वकिलांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांना ही रक्कम दिली गेली आहे.
वैद्यकीय विमा योजनेंतर्गत ज्या वकिलांनी अर्ज केले होते अशा 13 अर्जदारांना 17 लाख रुपयांचे वितरण करण्यात आले आहे. एकूण 8 कोटी 47 लाख 35 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत. आरटीजीएसनुसार त्यांच्या बँक खात्यावर ही रक्कम जमा करण्यात आल्याचे कर्नाटक राज्य बार कौन्सिलचे चेअरमन एल. श्रीनिवास बाबू यांनी पत्रकाद्वारे कळविले आहे.