प्रतिनिधी/ वास्को
मुरगाव मतदारसंघात मृत व्यक्तीकडून मतदार यादीतील नावे गाळण्याची शिफारस करण्याचा प्रकार घडलेला असून प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष संकल्प आमोणकर यांनी हा प्रकार उघडकीस आणून मंगळवारी संध्याकाळी मुरगावच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर कार्यकर्त्यांसमवेत निदर्शनेही केली. बनावट तक्रारदार तयार करून मुरगाव मतदारसंघातील 900 मतदारांची नावे गाळण्याचे प्रयत्न राजकीय दबावाखाली सुरू झाल्याचा आरोप संकल्प आमोणकर यांनी केला आहे.
मागच्या महिन्यात संकल्प आमोणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदार यादीतील भाजपा विरोधी मतदारांची नावे गाळण्याचा प्रयत्न चालल्याचा आरोप केला होता. मंगळवारी पुन्हा आमोणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी धक्कादायक प्रकार उघडकीस आणून मुरगावचे उपजिल्हाधिकारी सचिन फळदेसाई यांच्याकडे या कृत्त्यात गुंतलेल्यांविरूध्द कारवाईची मागणी केली. यावेळी प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी जनार्दन भंडारी, वरद म्हार्दोळकर व इतर कार्यकर्ते हजर होते. मुरगाव मतदारसंघातील 14 मतदारांच्या समावेशाला एका मृत व्यक्तीने हरकत घेतल्याचे आमोणकर यांनी म्हटले आहे. असे बनावट व्यक्ती तयार करून त्यांच्या हरकतींवरून 900 मतदारांची नावे गाळण्याचे कारस्थान रचले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ऑनलाईन माध्यमातून बनावट व्यक्ती नावे गाळण्यासाठी हरकतीं पाठवून आपला कार्यभाग साधू पाहात असून याची चौकशी व्हावी अशी मागणी आमोणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उपजिल्हाधिकाऱयांनी भेट देऊन केली. या कार्यकर्त्यांनी या कारस्थानांविरोधात उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनेही केली.
निदर्शनांच्या वेळी बोलताना संकल्प आमोणकर यांनी मंत्री मिलिंद नाईक यांना लक्ष्य केले. ते म्हणाले की, मुरगावमध्ये एकू 29 बीएलओ काम करीत असून या 29 पैकी 21 जण वीज खात्यातील कर्मचारी आहेत ते पूर्वीचे वीजमंत्री व विद्यमान नगरविकासमंत्री मिलिंद नाईक यांच्या मर्जीप्रमाणे वागत आहे. त्यांच्यावर मंत्र्याकडून दबाव येत आहे. त्यामुळे बनावट तक्रारदारांच्या नावाने मुरगावात विशेषता बायणा परीसरातील मतदारांची नावे गाळण्याचे प्रयत्न मोठय़ा प्रमाणात होत आहेत. मतदार यादीतील नावाना हरकत घेणाऱया काही व्यक्तींशी संपर्क साधून आपण स्पष्टीकरण मागीतले असता, त्या व्यक्ती परराज्यातील असल्याचे व अशा प्रकारांची त्याना कल्पनाच नसल्याचे आढळून आले. शिवाय मृत व्यक्तींनीही मतदार यादीतील नावाना हरकत घेतल्याने हे गौडबंगाल असल्याचे स्पष्ट झालेले आहे असे आमोणकर यांनी म्हटले आहे. नावे गाळण्याच्या प्रयत्नांबरोबरच काही कुटुंबांमध्ये अतिरीक्त नावे घुसडण्याचेही प्रकार होऊ लागल्याची माहिती आमोणकर यांनी दिली. आमोणकर व त्यांच्या कार्यकर्त्यांनी यासंबंधी एक निवेदन उपजिल्हाधिकाऱयांना सादर केले.