प्रतिनिधी/ पणजी
साल्वादोर दु मुन्दू पंचायत क्षेत्रातील तोर्ड पाटो येथे भर रस्त्यावर विलास मेथर यांच्यांवर पेट्रोल टाकून जाळून मारल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील एक संशयित अद्याप फरारी असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अटक केलेल्या संशयितांच्या विरोधात गुन्हा नोंद करून त्यांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तीन पोलीस निरीक्षक आणि एक उपअधीक्षकांनी केलेल्या तपासणीत तीन संशयितांना आपला गुन्हा कबूल केला आहे.
रविवारी सकाळी इकबाल नानपूरी या संशयिताला अटक केली आहे. संशयित पवन श्रीकांत बडिगर (37, धुळेर शेटयेवाडी, म्हापसा) व प्रशांत लक्ष्मण दाबोलकर (35, दाबोलीवाडा शापोरा, बार्देश) या दोन्ही संशयितांना सिंधुदुर्ग स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने तळेरे-वैभववाडी येथे अटक केली होती. इकबाल नानपूरी याला गोव्यात अटक केली आहे. विलास मेथर यांना जाळून मारण्यास या तिन्ही संशयितांचा प्रत्यक्ष सहभाग होता अशी माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.
अल्ताफने दिली सुपारी
तळेरे वैभववाडी येथे अटक केलेल्या संशयितांना गोव्यात आणल्यानंतर या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार अल्ताफ बट्टीकर व खय्याद शेख यांना गोवा पोलिसांनी शनिवारी रात्रीच अटक केली होती. मयत विलास मेथर व अल्ताफ बट्टीकर यांच्यात एका इमारतीच्या बांधकामवरून वाद सुरु होता. विलास मेथर यांनी स्थानिक पंचायतीत त्याबाबत तक्रार दाखल केली होती. तक्रार मेथर यांच्या बाजूने जाणार असल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले होते. त्यामुळे अल्ताफ याने मेथर यांचा काटा काढण्यासाठी काही दिवसांपूर्वी पवन, प्रशांत व इकबाल यांना सुपारी दिली होती. त्यानुसार संशयितांनी विलास मेथर यांचा काटा काढला होता. असे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करीत असून पुरावेही गोळा करीत आहेत.
आतापर्यंत पांच संशयित गजाआड
पर्वरी सारख्या नियमित लोकांची वर्दळ असणाऱया ठिकाणी भर रस्त्यात दिवसा ढवळ्या एका व्यक्तीला जाळून मारण्याचा गोव्यात पहिलाच प्रकार आहे. पर्वरीसह संपूर्ण गोव्यात खळबळ माजली होती. विविध राजकीय पक्षांनी तसेच समाजसेवकांनी संशयितांना अटक करण्याची मागणी करतांना पर्वरी पोलीस स्थानकावर मोर्चे नेले होते. 48 तास झाले तरी संशयितांना अटक होत नसल्याने पोलिसांच्या कामकाजावर लोकांनी संशय व्यक्त केला होता. अखेर खून प्रकरणातील पाच संशयितांना पोलिसांनी गजाआड केले आहे.
मयत विलास मेथर चावडेवर धनवाडी येथे फ्लॅटमध्ये राहत होते. त्यांचे साल्वादोर दु मुन्दू पंचायतीत दुकान आहे. बुधवारी दुपारी 1.15 वा. च्या सुमारास ते दुकान बंद करून घरी आपल्या जीए 03 आर 5727 कारने जात होते. साल्वादोर दु मुन्दू पंचायत क्षेत्रातील तोर्ड पाटो येथे ते पोचले असता. संशयितांनी त्यांच्या गाडीच्या मागच्या बाजूला आपल्या वाहनाने ठोकर दिली. कोणीतरी आपल्या कारला ठोकर दिल्यामुळे त्यांना जाप विचारण्यासाठी मेथर आपल्य कारमधून बाहेर आले व संशयितांच्या कारकडे गेले. संशयित आणि मेथर यांच्यात बाचाबाची झाली. काय होतय हे कळण्या अगोदरच संशयितांनी मेथर यांच्या अंगावर पेट्रोल टाकले व त्यांना पेटवून दिले. अवघ्या काही मिनिटांतच आगीने पेट घेतल्याने मेथर यांना काय करावे ते सुचत नव्हेत त्याही स्थिती त्यांना स्वतःला वाचविण्यासाठी रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात उडी घेतली व आरडा ओरडही केला होता. जवळपास असलेल्या लोक घटनास्थळी आल्यानंतर संशयितांनी पोबारा केला होता. मेथर यांना तत्काळ 108च्या सहाय्याने गोमेकॉत भरती करकरण्यात आले होते. उपचाक घेच असतानाच दुसऱया दिवशी त्यांचे निधन झाले.