कोलंबिया : माजी अध्यक्षांना लागण
कोलंबियाचे माजी अध्यक्ष एलवॅरो यूरीब यांना कोरोनाची बाधा झाली आहे. यूरीब यांना पुराव्यांमध्ये फेरफार केल्याच्या एका प्रकरणी मंगळवारी स्थानबद्ध करण्यात आले होते. यूरीब यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. कुठलीच गंभीर लक्षणे दिसून आलेली नाहीत. तसेच त्यांना श्वास घेण्यास त्रासही होत नसल्याची माहिती डेमोक्रेटिक सेंटर पार्टीचे प्रवक्ते गॅब्रियल वेलास्को यांनी दिली आहे.
ब्राझील : 97 हजार बळी
ब्राझीलमध्ये मागील 24 तासांमध्ये 57 हजार 152 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचा एकूण आकडा 28 लाख 62 हजार 761 वर पोहोचला आहे. ब्राझीलच्या आरोग्य मंत्रालयानुसार मागील 24 तासांमध्ये 1,437 जणांचा बळी गेल्याने मृतांचा आकडा 97 हजार 418 झाला आहे. संसर्गाप्रकरणी अमेरिकेनंतर ब्राझील दुसऱया क्रमांकावर आहे. ब्राझीलचे अध्यक्ष जायर बोल्सोनारो आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील 8 सदस्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
रायर एअरला इशारा
इटली सरकारने रायन एअर एअरलाइन्सवर बंदी घालण्याचा इशारा दिला आहे. एअरलाइन्सने सुरक्षा नियमांचा भंग केला आहे. अशा स्थितीत देशातील याची सेवा रोखली जाऊ शकते, असे इटलीच्या नागरी उड्डाण प्राधिकरणाने सांगितले आहे. रायन एअर एअरलाइन्स इटलीत किफायतशीर सेवा पुरविण्यासाठी ओळखली जाते. इटलीतील सर्व एअरलाइन्ससाठी सरकारने मे महिन्यात नवे नियम लागू केले होते.
एंटवर्प प्रांतात संसर्ग
जर्मनीने एंटवर्प प्रांताला क्वारंटाईन यादीत सामील केले आहे. या प्रांतात कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढले आहेत. एंटवर्पमधून येणाऱया लोकांना स्वतःचा निगेटिव्ह चाचणी अहवाल दाखवावा लागणार आहे. हा अहवाल नसलेल्या लोकांना 14 दिवसांसाठी विलगीकरण करावे लागणार आहे. जर्मनीत आतापर्यंत 2 लाख 14 हजार 404 बाधित सापडले आहेत. तर 9 हजार 245 बाधितांचा मृत्यू ओढवला आहे. 1 लाख 94 हजार 700 बाधितांना संसर्गापासून मुक्ती मिळाली आहे.
मध्य जपानमध्ये आणीबाणी
मध्य जपानच्या गव्हर्नरांनी कोरोनाबाधितांची वाढती संख्या पाहून आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली आहे. व्यवसाय आणि लोकांनी स्वतःच्या हालचाली रोखाव्यात, असे त्यांनी म्हटले आहे. ऐकी प्रिफेक्चरमध्ये जुलैपासून दररोज नवे रुग्ण सापडत आहेत. या फ्रिक्चेरच्या अंतर्गत नागोया आणि टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचे मुख्यालय येते. सर्व व्यवसाय बंद करण्यास सांगण्यात आले असून लोकांना रात्रीच्या वेळी घरातच राहण्याची सूचना करण्यात आल्याची माहिती गव्हर्नर हिडियाकी यांनी दिली आहे.
चीनमध्ये नवा संक्रमक आजार
वुहानमधून फैलावलेल्या कोरोना संसर्गाशी जग अद्याप झगडत आहे. परंतु याचदरम्यान चीनमध्ये एका नव्या संक्रामक आजाराने हातपाय पसरविण्यास प्रारंभ केला आहे. या नव्या संसर्गामुळे चीनमध्ये 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 60 जणांना याची बाधा झाली आहे. हा नवा संसर्गही मानवांमध्ये फैलावू शकतो, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे. पूर्व चीनच्या जियांग्सू प्रांतात मागील 6 महिन्यांदरम्यान एसएफटीएस विषाणूची लागण 37 पेक्षा अधिक जणांना झाली आहे. तर अन्हुई प्रांतातही 23 जणांना हा संसर्ग झाल्याचे समोर आले आहे. जियांग्सूची राजधानी नानजियांग येथील एका महिलेला प्रारंभी खोकला आणि तापाची लक्षणे दिसून आली होती. एक महिन्याच्या उपचारानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. एसएफटीएस विषाणूमुळे अन्हुई आणि झेजियांग प्रांतात किमान 7 जणांचा मृत्यू झाला आहे. परंतु एसएफटीएस विषाणू जगासाठी नवा नाही. चीनमध्ये 2011 मध्ये पहिल्यांदा याची माहिती समोर आली होती. हा संसर्ग प्राण्यांच्या शरीरावर चिकटून राहणाऱया गोचिडीद्वारे मानवांमध्ये फैलावू शकतो, असे वायरोलॉजिस्टांचे मानणे आहे.