जपानी जहाज धोक्यात टाकल्याचा आरोप
वृत्तसंस्था/ पोर्ट लुइस
एमव्ही वकाशियो या जपानी जहाजाचे कॅप्टन सुनील कुमार नंदेश्वर यांना मॉरिशस पोलिसांनी अटक केली आहे. 58 वर्षीय नंदेश्वर हे भारतीय नागरिक आहेत. वाढदिवस साजरा करण्यासाठी नंदेश्वर यांनी जहाज किनाऱयानजीक आणले आणि यातून ते दुर्घटनाग्रस्त झाल्याचा आरोप आहे. हे जहाज दोन हिस्स्यांमध्ये तुटले असून यातील हजारो लिटर तेलाची गळती झाली आहे.
या जहाजावरील चालक दलाच्या अन्य सदस्यांचीही पोलीस चौकशी करत आहेत. 25 जुलै रोजी हे जहाज दुर्घटनाग्रस्त झाले होते. मागील आठवडय़ात या जहाजाचे दोन तुकडे झाले होते. नंदेश्वर यांना 25 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. जहाजाच्या फर्स्ट ऑफिसरलाही अटक करण्यात आली आहे.
एमव्ही वकाशियो या जहाजाची मालकी नागाशिकी कंपनीकडे आहे. खराब हवामानामुळे जहाज दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा कंपनीने केला आहे. मॉरिशसचे पंतप्रधान प्रविंद जगन्नाथ यांनी याप्रकरणी 8 ऑगस्ट रोजी पर्यावरणीय आणीबाणी जाहीर केली होती. तेलगळती झालेल्या ठिकाणी ब्ल्यू बे मरीन पार्क आहे. तेलगळतीमुळे सागरी जीवसृष्टीला धोका निर्माण झाला आहे.
जहाजावर तेलाचा साठा
जहाजावर 3 टँकांमध्ये 2500 मेट्रिक टनापेक्षा अधिक कच्चे तेल होते. जहाजाच्या तुटलेल्या तुकडय़ांपैकी एक किनाऱयानजीक आणला जाणार आहे. तर 90 टन कच्च्या तेलासह दुसऱया तुकडय़ाला समुद्रात बुडविण्याची योजना आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांनी या योजनेवर आक्षेप घेतला आहे. दुसरा हिस्सा बुडविले जाणारे ठिकाण व्हेल माशांसाठी संरक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे.