पंतप्रधान कार्यालयाचे पायाभरणी कार्यक्रमावर शिक्कामोर्तब
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बुधवार, 5 ऑगस्ट रोजी राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा होणार आहे. या सोहळय़ाला पंतप्रधान उपस्थित राहणार असल्याचे पंतप्रधान कार्यालयाने मंदिर समितीला कळवले आहे. पायाभरणीचा सोहळा सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे. या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत अयोध्येत रामजन्मभूमी स्थळी उपस्थित राहणार आहेत. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर या सोहळय़ाला ठराविक लोकांनाच आमंत्रित करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
अयोध्येतील भव्य राममंदिराच्या बांधकामासंदर्भात विचारविमर्ष करण्यासाठी ट्रस्टच्या सदस्यांची एक बैठक शनिवारी झाली होती. या बैठकीत पायाभरणीसाठी 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यासंबंधीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठविल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाने 5 ऑगस्ट या तारखेला मंजुरी दिली आहे. त्यानुसार आता पुढील तयारी सुरू करण्यात येणार आहे. 5 ऑगस्टचा सोहळा केवळ 100 ते 150 लोकांच्याच उपस्थितीत पार पाडण्याचे नियोजन आहे. पायाभरणी झाल्यानंतर काही दिवसातच अयोध्येत राममंदिर उभारण्याच्या प्रत्यक्ष कामाला तातडीने सुरुवात होणार आहे.
5 ऑगस्टला अनोखा योगायोग…
मोदी सरकारने 2019 मध्ये 5 ऑगस्टला जम्मू काश्मीरशी संबंधित असलेले अनुच्छेद 370 रद्द केले होते. त्यानंतर आता 2020 मध्ये 5 ऑगस्टला राम मंदिराच्या भूमिपूजनाचा योग साधण्यात आला आहे. लागोपाठच्या दोन वर्षांमध्ये एकाच दिवशी दोन महत्त्वाचे निर्णय घेत मोदी सरकार नवा योगायोग साधण्याच्या तयारीत आहे.