500 पेक्षा अधिक जण नसणार- ममतांनी प्रचारसभांचा वेळ केला कमी
कोरोनाच वाढती रुग्णसंख्या पाहता भाजपने पश्चिम बंगालमध्ये मोठय़ा सभा, जाहीरसभा तसेच आयोजनांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप बंगाल निवडणुकीच्या उर्वरित तीन टप्प्यांमध्ये छोटय़ा सभा घेणार असल्याचे सांगण्यात आले आहे. यांतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य केंद्रीय मंत्र्यांच्या सभांमध्ये 500 पेक्षा अधिक लोक सामील होऊ शकणार नाहीत. तसेच सर्व सभा मोकळय़ा जागेत आयोजित केल्या जाणार आहेत.
6 कोटी मास्कचे होणार वाटप
पश्चिम बंगालमध्ये 6 कोटी मास्क आणि सॅनिटायजरचे वाटप करण्याचे उद्दिष्ट भाजपने बाळगले आहे. कोरोना दिशानिर्देशांचे कठोर पालन करण्याचा निर्णयही भाजपने घेतला आहे. बंगाल निवडणुकीतील 5 टप्प्यांमधील मतदान संपले आहेत. तर तीन टप्पे अद्याप शिल्लक आहेत.
अपना बूथ-कोरोनामुक्त अभियान
भाजप अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा यांनी सोमवारी पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसोबत आभासी बैठक घेतली होती. नड्डा यांनी पक्ष कार्यकर्त्यांना ‘अपना बूथ-कोरोनामुक्त’ मोहीम सुरू करण्याची सूचना केली आहे. यांतर्गत पक्ष सर्व राज्यांमध्ये डेडिकेटेड कोरोना हेल्प डेस्क आणि कोविड हेल्पलाईन क्रमांकही प्रदान करत आहे.
कोलकात्यात प्रचार नाही
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाचा प्रभाव बंगालच्या उर्वरित टप्प्यातील निवडणुकीवर दिसू लागला आहे. तृणमूल नेत्या ममता बॅनर्जी यांनी कोलकाता शहरात प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्या प्रचाराच्या अखेरच्या दिनी म्हणजेच 26 एप्रिल रोजी एक प्रतिकात्मक बैठकीत सामील होतील. त्यांनी सर्व जिल्हय़ांमधील प्रचारसभांचा वेळ 30 मिनिटांपुरती मर्यादित केला आहे. तर डाव्या पक्षांनीही राज्यात मोठी प्रचारसभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
राहुल यांच्या सभा रद्द
कोरोनाची स्थिती पाहता पश्चिम बंगालमधील स्वतःच्या सर्व जाहीरसभा स्थगित करत असल्याचे काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी म्हटले होते. त्यांनी अन्य राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही याबाबत गांभीर्याने विचार करण्याचा सल्ला दिला होता.
3 टप्प्यांमधील मतदान शिल्लक पश्चिम बंगालच्या 294 मतदारसंघांसाठी 8 टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात 27 मार्च रोजी 30 जागा, 1 एप्रिल रोजी दुसऱया टप्प्यात 30 जागा आणि तिसऱया टप्प्यात 6 एप्रिल रोजी 31 जागांकरता मतदान झाले आहे. त्यानंतर 10 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात 44 जागांकरता मतदान पार पडले आहे. शनिवारी पाचव्या टप्प्यांतर्गत 45 मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे. 22 एप्रिल रोजी सहाव्या टप्प्यात 43 जागांकरता मतदान होणार आहे. त्यानंतर सातव्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी 36 जागा तर 29 एप्रिल रोजी आठव्या टप्प्यात 35 जागांवर मतदान होणार आहे.