माजी आमदार तथा मगोचे नेते परशुराम कोटकर यांची मागणी
प्रतिनिधी / पेडणे
भाऊसाहेब बांदोडकर हे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री जे मांदे मतदारसंघातून निवडून आले होते. पेडण्याचे ते भाचे, पेडण्यात त्यांचे बालपण गेले. पेडण्यात लहानाचे मोठे झाले, आम्हा संपूर्ण पेडणेवासियाना त्यांचा अभिमान आहे. त्यामुळे मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकरांच नाव देणे योग्य आहे, अशी मागणी पेडण्याचे माजी आमदार आणि मगो पक्षाचे नेते परशुराम कोटकर यांनी केली आहे.
भाऊसाहेब बांदोडकरांचे पेडणे महालासाठी सर्वात जास्त योगदान आहे. सरकारने कुठल्याच वादाला सामोरे न जाता, लोकांच्या भावना न दुखविता स्व. भाऊसाहेब बांदोडकरांच नावावर शिक्कामोर्तब करावे, असेही माजी आमदार परशुराम कोटकर यांनी यावेळी बोलून दाखविले.
भाऊसाहेबांच्या नावावर अजूनही राजकारण करू नये. भाजप सरकारात मगोचे सुदिन ढवळीकर व अन्य आमदार आहेत, त्यांनी सर्वांनी मोप आंतरराष्ट्रीय विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकरांच नाव देणे ही मागणी लावून धरावी व मागणी पूर्ण होत नसेल तर सरकारातून गरज पडल्यास बाहेर पडावे, असा सल्ला त्यांनी दिला.